ऐन उन्हाळ्यात शहाळ्याचा उतारा

ऐन उन्हाळ्यात शहाळ्याचा उतारा

Published on

कासा, ता. २८ (बातमीदार) : शहाळ्यातील मधुर पाण्याला तशी वर्षभर मागणी असते, पण उन्हाळ्यामुळे मागणी सध्या दुप्पट-तिपटीने वाढली आहे. यामुळे रुग्णालय, रेल्वे स्थानक, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात नारळ पाण्याची विक्री होताना दिसत आहे. यामुळे विविध थंड पेये, आईसक्रीमच्या जमान्यातही नारळपाणी आपले अस्तित्व टिकवून आहे. नारळाची मागणी वाढल्याने स्वाभाविकपणे त्याचा भावही वधारला आहे.
उन्हाने कासावीस झाल्यानंतर थंड पेयाने तात्पुरता थंडावा मिळतो. लिंबू-सरबत किंवा फळांच्या रसाचाही प्रभाव काही काळच राहतो; मात्र स्वच्छ कुठलीही भेसळ नसणारे पेय म्हणजे नारळपाणी. हिरव्यागार शहाळ्यातील मधुर पाण्याचा नागरिक आस्वाद घेत आहेत. नारळपाणी केवळ तहान भागवत नाही, तर उन्हाळ्याने ‘डिहायड्रेड’ झालेल्या शरीरात नवी तरतरी देते. थंड पेय, सरबताच्या भाऊगर्दीत हे निर्मळ पेय आपली शान टिकवून आहे. दोन शहाळ्यांचे पाणी आणि त्यातील कोवळे खोबरे खाल्ल्यास शरीराला उर्जा मिळते, असे डॉक्टर सांगत असतात.
रुग्णालयाच्या परिसरातील फळविक्रेते किंवा हातगाडीवर शहाळे हमखास मिळते. बाजारपेठेत ठिकठिकाणी असलेल्या फळांच्या दुकानांत व हातगाड्यांवरही ते उपलब्ध असतात. पण सध्या उन्हाच्या झळा वाढल्याने नेहमीपेक्षा मागणीत दुप्पट-तिप्पट वाढ झाली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.
डहाणू, वानगाव, बोर्डी, कासा, गंजाड, आशागड परिसरात नारळाच्या खूप मोठ्या बागा आहेत. या बागांमध्ये विक्रेते नारळाची खरेदी करण्यासाठी जातात. विक्रेत्यांना बारा ते १५ रुपयांपर्यंत जागेवर शहाळे मिळते, तर वाहतूक आणि इतर खर्च गृहीत धरून विक्रेते ३० ते ४० रुपयांपर्यंत या नारळांची विक्री करतात, असे नारळ विक्रेत्यांनी सांगितले.
.....
आजारी पडल्यावर अनेक जण शहाळ्याचे पितात, पण आजारी नसतानाही दररोज शहाळ्याचे पाणी प्यायल्यास कोणत्याही इतर औषधांची गरज पडत नाही. उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन केल्याने त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो.
- डॉ. प्रदीप धोडी
....
उन्हाळ्यात शहाळ्याला मागणी खूप आहे. त्यात सध्या रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवांकडून उपवास ठेवले जातात. त्यामुळे अनेक फळांसह शहाळ्याची मागणी वाढली आहे. डहाणू तालुक्यात मुबलक शहाळी मिळतात, पण ही शहाळी बाजारात आणेपर्यंत खूप खर्च येतो. त्यामुळे त्यांचा दरही वाढला आहे.
- सलामत शेख, शहाळे विक्रेता, कासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.