सगुण, निर्गुण भक्तीची अनुभूती देणारा ‘ब्रह्मनाद’

सगुण, निर्गुण भक्तीची अनुभूती देणारा ‘ब्रह्मनाद’

Published on

विरार, ता. १७ (बातमीदार) : वसईतील सर्व कलाकारांना एकत्र आणून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य ‘वसई कला अकादमी’ करीत आहे. नवनवीन कल्पना घेऊन कलाकारांना घडवीत आहे. अशाच संगीत क्षेत्रातील प्रथितयश कलाकारांना घेऊन वसईतील काँग्रेस हाऊस येथे चैत्र महिन्यातील धार्मिक वातावरणात अनिल ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेला व डॉ. मनीषा कुलकर्णी व श्री. विवेक पर्वते यांच्या संशोधनातून उभारलेला ‘ब्रह्मनाद’ हा सगुण-निर्गुण भक्तीची अनुभूती देणारा, आगळावेगळा तसेच अवकाश, सृष्टी व भारतीय संस्कृतीचा वेध घेणारा कार्यक्रम रसिकांच्या भरघोस प्रतिसादात सादर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ओमकाराने झाली. या वेळी विवेक पर्वते यांच्या प्रबोधनात्मक आणि रसाळ निवेदनातून अनादी कालापासून ते आजपर्यंतचा संगीत प्रवास अभ्यासपूर्ण रितीने मांडण्यात आला. मुंबई विद्यापीठात अध्यापनाचे व्रत घेतलेले पं. कोठंबीकर व विदुषी डॉ. मनीषा कुलकर्णी, गायक धनंजय म्हसकर, सिद्धेश जाधव व शास्त्रीय संगीतापासून ते लोकसंगीतात लीलया वावरणारी पद्मजा पाटील अशा या गायक कलाकारांनी काही स्वत: रचलेल्या, तर काही पारंपरिक चालींसह त्यावर साज चढवला व रसिकांना तृप्त केले. या सर्व मैफलीला मोहित निजाई (हार्मोनियम), रुपक वझे (तबला), कल्पेश करडे (मृदंग), अक्षय मसणेकर (बासरी), चिराग बाढे (सिंथेसायजर) व जय सुपेकर (हॅन्डसोनिक) यांनी चांगली साथ दिली. तीन तासांच्या दर्जेदार मैफलीला रसिकांनी मोठी दाद दिली.

----------------
गुरूंसमोर गाण्याचा अत्युच्च अनुभव
कैलास ठाकूर यांची प्रकाशयोजना व महेश कुलकर्णी यांनी व्हिडीओद्वारे संकल्पनेला तितक्याच समर्थपणे दिलेली साथ वाखाणण्यासारखी होती. ‘ब्रह्मनाद’सारखा जड विषय निवेदक विवेक पर्वते यांनी रसिकांना समजायला सोपा केला. पं. कोठंबीकर व डॉ. मनीषा यांच्या तालमीत तयार झालेल्या पद्मजा पाटील, धनंजय म्हसकर व सिद्धेश या शिष्यांबरोबर त्यांच्या गुरूंनी गाणे हाच मुळी रोमांचक अनुभव आहे. गुरूंसमोर आपल्या कलेचा उच्च दर्जाच त्याला द्यावा लागतो. त्यामुळे सूर, लय व ताल याचा रसिकांना अत्युच्च अनुभव आला. या कार्यक्रमासाठी अकादमीचे कार्यकर्ते सुषमा ठाकूर, मोहन घरत, हेमंत राऊत, विरेंद्र पाटील, किरण पष्टे व जयंत बर्वे यांनी योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.