मुंबई - वाराणसी दरम्यान अल्ट्रा सुपरफास्ट ट्रेन सुरू करा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : उन्हाळी सुट्यांमध्ये कुटुंबासह उत्तरेकडील राज्यांतील आपल्या गावी जाणाऱ्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई ते वाराणसीदरम्यान सामान्य तिकीट दरांत अतिरिक्त अल्ट्रा सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
आता उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होत आहेत. साधारणतः लहान मुलांना मे महिन्यामध्ये शाळांना सुट्या पडतात. लांब पल्ल्यांच्या ज्या गाड्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार व उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना गंतव्य स्थळी पोहचायलाच तीन ते चार दिवस लागतात. त्यात कुटुंबासोबत गर्दीमध्ये जाताना अनेकदा छोटे-मोठे अपघातसुद्धा होतात. या समस्या सोडवण्यासाठी या उन्हाळी सुट्यांच्या काळात मुंबई ते वाराणसीदरम्यान दुरांतो एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेससारख्या अतिरिक्त अल्ट्रा-सुपरफास्ट ट्रेन्स सोडल्या जाव्यात, अशी मागणी भाई जगताप यांनी केली.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांची भेट घेतली व त्यांना आपल्या मागणीचे पत्र दिले.
महाराष्ट्रात गणेशोत्सव, शिमगोत्सव किंवा आंगणेवाडी यात्रेच्या वेळेस रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त स्पेशल ट्रेन्स सोडल्या जातात. त्याच धर्तीवर उन्हाळी सुट्यांदरम्यान लांब पल्ल्याच्या अतिरिक्त अल्ट्रा सुपरफास्ट ट्रेन्स सोडल्या जाव्यात. त्यामुळे नागरिकांना गंतव्य स्थानी पोहचायला तीन ते चार दिवस न लागता त्यांना १८ ते २० तासांत पोहचता येईल. तसेच या ट्रेन्सच्या तिकिटांचे दर वाढीव नसून ते सामान्य असावेत व सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असावेत.
- भाई जगताप, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.