ऐन उकाड्यात सरकारचे ‘पहिले पाऊल’!

ऐन उकाड्यात सरकारचे ‘पहिले पाऊल’!

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : खारघर येथील महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेनंतर मोकळ्या मैदानांवरील कार्यक्रमांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे; परंतु शिक्षण विभागाने २५ ते २७ एप्रिलदरम्यान पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी म्हणून ‘पहिले पाऊल’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. वाढत्या तापमानाने उष्माघाताचा धोका असताना, आयोजित केलेला हा कार्यक्रम वादात सापडण्याची शक्यता आहे.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शाळा २१ एप्रिलपासून बंद केल्या आहेत. त्यानंतरही शिक्षण विभागाचा मुलांसाठी ‘पहिले पाऊल’ या उपक्रमाचा अट्टहास सुरू आहे. ‘स्ट्रेंग्थनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेटस प्रोजेक्ट’अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी अभियानअंतर्गत ‘पहिले पाऊल’ हा उपक्रम मेळाव्याच्या स्वरूपात राबवला जात आहे. पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद आणि मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

गेल्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुंबईत गेल्या वर्षी एक लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या वर्षीही इतकेच विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. कडाक्याचे ऊन असताना एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची गरज काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पालकांना गर्दी न करण्याचे आवाहन
२५ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाकडून वरळी सीफेस पालिका शाळा येथे प्रातिनिधिक स्वरूपात शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे; तर २६ एप्रिल रोजी पालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मेळावे होणार आहेत. मेळाव्यास शालेय शिक्षण सचिव रणजीत सिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी, माता पालक गटांचे प्रतिनिधी, प्रथम संस्थेचे प्रतिनिधी, राजकीय नेते तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पालकांनी कार्यक्रमांना गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.