चला बस्ता बांधायला...

चला बस्ता बांधायला...

Published on

वसंत जाधव, नवीन पनवेल
लग्न ठरल्यानंतर सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नाची खरेदी. लग्नाचा बस्ता हा मोठा कार्यक्रम. वधू-वरापासून सर्व नातेवाईकांपर्यंत सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते. या सोहळ्यात वधू आणि वर आकर्षणाचे केंद्र असल्याने त्यांचा लूक सर्वाधिक आकर्षक असणे गरजेचे कायम आहे. काळानुसार परंपरा बदलत असल्या, तरी पूर्वीप्रमाणे लग्नाचे दिवस वाढत आहेत. लोकांचा पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा कल सध्या वाढला आहे.
मागील काळात कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य लोकांच्या लग्नाच्या खरेदीचेही बजेट कमी झाले आहे. परवडणाऱ्या दरात समाधानकारक खरेदी हवी असणारे लोक ८० टक्के, तर वारेमाप खर्च करू शकणारे २० टक्के संख्या आहे. दोन्ही वर्गांना भावतील अशा कपड्यांचे वैविध्य पाहायला मिळत. पारंपरिक पद्धतीप्रमाणे सध्या पुन्हा तीन-चार दिवस लग्नसोहळा रंगत आहे. साखरपुडा, मेंदी, हळद, संगीत, लग्नाच्या दिवशी असणारे विविध विधी आणि लग्नाचे रिसेप्शन, पूजा अशा अनेक कार्यक्रमांसाठी निरनिराळे पेहराव आणि दागिने परिधान केले जातात. लग्नात भरपूर साड्यांची खरेदी केली जाते. सध्या लग्नसमारंभात पारंपरिकचा ट्रेंड जास्त आहे. वधूसाठी साखरपुडा, हळद, तेळफळ आणि लग्नासाठी चार साड्या खरेदीकडे कल आहे.

एकाच रंगाचे पोशाख
सध्याच्या काही वरांची पसंती लग्नात पारंपरिक भारतीय, तर रिसेप्शनला पाश्चात्त्य पोशाखाला दिली जाते. एकच रंग; एकाच डिझाइनचे कपडे सर्व महिलांनी नेसण्याचाही ट्रेण्ड आहे. काही लग्नांमध्ये तर वधू-वर व करवलीसाठी सारख्याच रंगाचे पोशाख तयार करवून घेण्यात येत आहेत.

लेहंग्याचा ट्रेंड
वधूला साडीपेक्षाही घागरा-चोळी आवडते. लेहंग्याचा ट्रेंड सुरू असला, तरी शालूलाही मागणी आहे. साड्यांमध्ये सिल्क, दाक्षिणात्य शैलीतील ब्रोकेड, टिश्यू कांजीवरम; तसेच बनारसीला मागणी आहे. संगीत कार्यक्रमासाठी आवर्जून हँडवर्क केलेल्या गाऊनला पसंती दिली जाते. प्रत्यक्ष लग्न सोहळ्यात लेहंगा-चोळीला क्रेझ सध्या इतकी आहे की वधूबरोबरच कुटुंबातील तरुण व ‘लग्नाचा बस्ता’ कार्यक्रमाची क्रेझ आजही जाते. पूर्वी वधूसाठी पैठणीला महत्त्व होते. आता काळ बदलला तसा पेहराव बदलत आहे. मध्यमवयीन महिलाही लेहंग्याचा पेहराव करत आहेत. वधूसाठी ४० हजार ते तीन लाख रुपये किमतीपर्यंतचे लेहंगे खरेदी करण्यात येतात. त्यानुसार दागिने खरेदी केले जातात.

‘बस्ता’ म्हणजे काय?
साखरपुड्यापासून ते विवाहापर्यंतच्या काळात वधूचा पोशाख आणि दागदागिने यांची; तसेच वराचा पोशाख यांची खरेदी केली जाते. ऐपतीनुसार वरपक्षाकडून वधूकरिता आणि वधूपक्षाकडूनही वरासाठी एखादा दागिना; तसेच वरमाई आणि इतर मानापानाच्या साड्या, कपडे इत्यादींची खरेदी केली जाते. या कापडखरेदीला ‘बस्ता बांधणे’ असे नाव आहे. यासाठी भावकी व पै पाहुण्यांसह दोन्ही पक्षांच्या जवळपास २५ ते ३० माणसांची संख्या असते. दिवसभरात दोन चार बस्ते झाले, तरी दुकानदाराचांचे समाधान होते.

बस्त्याला मोठी मागणी आहे. पैठणीपासून शालूच्या साड्यांची खरेदी केली जात आहे. कोविडनंतर नातेवाइकांसाठी साड्यांची संख्या कमी झालेली आहे. २० हजारांपासून ते लाखो रुपयांचा बस्ता खरेदी करण्यात येत आहे.
- अमोल सस्ते, शांताई टेक्स्टाईल, साडी दालन

लग्नसराईत नवरी मुलीसाठीची; तसेच मानपानाच्या साडीची खरेदी होत आहे. विविध प्रकारचे शालू, पैठणीकडे महिलावर्गाची पसंती आहे. बदलत्या ट्रेंडमध्ये बस्त्याला मागणी आहे.
- निखिल सोनी, श्री. दीपक साडीज, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.