भाजीपाला लागवडीवर भर

भाजीपाला लागवडीवर भर

Published on

पाणलोट विकासावर लक्ष केंद्रित
शेततळी, गॅबियन बंधारे, चर, बांधबंदिस्ती कामांना प्राधान्य

तळा (बातमीदार) ः तालुक्यातील सोनसडे, भानंग, काकडशेत, मेढे, फळशेत-कर्नाळा, निगुडशेत अशा सहा
ग्रामपंचायतीच्या जवळपास १२ गावांमध्ये सरकारच्या मृदू व जलसंधारण विभाग आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटकांतर्गत पाच वर्षांत जलसिंचनावर भर दिला जाणार आहे. लोकसहभागातून ही कामे होणार असल्‍याने जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
डोंगर-उतारावर समतल चर खणल्‍यास जमितीत पाणी मुरेल, विहिरीतील-भूगर्भातील पाणीसाठा वाढेल. नदी नाल्यावर सिमेंट बंधारा बांधल्‍यास भाजीपाला लागवड, गुरेढोरे यांना पाणी मिळेल. काही ठिकाणी जमिनीची धूप थांबवण्यासाठी व पाणी मुरण्यासाठी गॅबियन बंधारे बांधण्यात येणार आहेत.
फळलागवडीसाठी शेतकऱ्यांना वैयक्तिकरीत्‍या अनुदान दिले जाणार आहे. यातून शेततळी, प्लास्टिक आच्छादन असून साठवलेल्या पाण्यावर फळबाग, काही ठिकाणी मत्‍स्‍य शेती करता येईल. यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्‍तर उंचावेल. त्‍याचबरोबरच अल्पभूधारक, भूमिहीन, व बचत गटांना योजनेत समाविष्ट करण्यात येणार असून त्‍यांच्या हाताला काम व बचत गटांना विविध व्यवसायासाठी प्रोत्‍साहन दिले जाणार आहे.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने पुढे यावे. या योजनेतून शिवारात पाण्याचा साठा वाढणार आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत भूगर्भातील जलस्‍तर उंचावण्यास मदत होईल. त्‍यामुळे पाणीटंचाईवर मात करता येईल शिवाय भातशेतीबरोबरच फळबाग, फुलशेतीही करता येईल.
- माधुरी पारावे, सरपंच/अध्यक्षा, पाणलोट समिती सोनसडे.

ज्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे,अशा कोरडवाहू गावात पाणलोट विकास योजना शासन राबवण्यात येत आहे. गावातल्या नागरीकांनी जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून फळबाग
लागवड करावी व जलसंधारणाच्या कामातही मदत करावी, त्‍यामुळे गावाचा विकास होईल.
- रघुनाथ वाघरे, सरपंच/अध्यक्ष पाणलोट समिती, भांनग

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामात लोकांनी जास्त जास्त सहभागी होऊन मृदू व जलसंधारणाच्या योजना गावात राबवून शिवारातील पाणी शिवारात कसे मुरेल, याकडे लक्ष द्यावे व वैयक्तिक फळबाग लागवड, शेततळी अशा योजनांचा लाभ घ्यावा.
- सुहास भालेकर, संचालक/अभियंता, मानव ग्रामीण विकास व संशोधन संस्था

..............
फळबाग लागवडीसाठी मशागतीच्या तयारी
तळा (बातमीदार) ः तालुक्यातील शेतकरी फळबाग लागवडीला प्राधान्य देत असून मशागतीची जोरदार तयारी सुरू आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी खड्डे भरणे, फळबाग लागवडीसाठी माती भरणे, शेणखत टाकणे, त्यात खते भरणे, मुंग्या, वाळवी लागू नये यासाठी औषधी पावडर टाकणे याबाबत कृषी सहायक योगेश कोळी हे मार्गदर्शन करीत आहेत. त्‍यानंतर रोपे तयार झाल्‍यावर कशा पद्धतीने लावावी, याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे.
.............


भाजीपाला लागवडीवर भर
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वितरण
अलिबाग, ता. १७ (बातमीदार) ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरच्या घरी भाजीपाला मिळावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीची सवय राहावी यासाठी कृषी विभागाने भाजीपाल्याची बियाण्यांचे मोफत वाटप केले आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने येथे कृषी सहायक अशोक मिसाळ यांच्या हस्ते शेकडो शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणांचे किट देण्यात आले. या उपक्रमात महिला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रायगड जिल्ह्यात भातशेतीचे सुमारे ९५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. भात लागवडबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे यासाठी कृषी विभागामार्फत भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी विभागाने भातशेतीबरोबरच भाजीपाला, फळपिके, फुलशेती, बांबू लागवड करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी विभागाने घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
घरासमोरील अथवा पडीक जागेच्या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करता यावी यासाठी शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे वाटप सुरू केले आहे. यावेळी कृषी सहायक अशोक मिसाळ यांनी, कृषी विषयक सरकारी योजनांची तसेच बचत गटासाठी असलेल्या योजनांची माहिती दिली.

-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.