Aditi Tatkare
Aditi Tatkare sakal media

Aditi Tatkare : मंत्रिपदावरून संघर्षाची ठिणगी, तटकरे-शिंदे गटामधील वार-प्रतिवार

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.३ : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या गटात सहभागी झालेल्या अजित पवार यांच्याबरोबर आदिती तटकरे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अशातच मंत्रिपदासाठी वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले महाडचे आमदार भरत गोगावले यांनी देखील आठवडाभरातच आपली वर्णी मंत्रिमंडळात लागणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मंत्रिपदावरून रायगडात पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

Aditi Tatkare
Ajit Pawar : रायगडमध्ये राजकीय उलथापालथ

रायगड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी रायगडला नवे पालकमंत्री मिळणार असल्याचे सांगत सस्पेंस वाढवला होता. तेव्हापासूनच भरत गोगावले यांनी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न सुरू केले होते. हे प्रयत्न आता संपतील असे सर्वांनाच वाटत असतानाच आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेत या महानाट्यात प्रवेश केला आहे. हा प्रवेश शिंदे गटातील आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांना चिंतेत टाकणारा आहे. कारण ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ते साध्य झालेच नसल्याने हे नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

अशातच आता आदिती तटकरे यांच्याकडेच पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच वर्तवले जात आहे. त्यामुळे भरत गोगावले मुंबईत ठाण मांडून आहेत. गोगावले यांचा रविवार (ता.२) सुरत येथे पूर्वनियोजित कार्यक्रम होता. पण त्याचवेळेला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याने त्यांना अचानक मुंबईत बोलावण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याबरोबर अन्य कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

तटकरे-शिंदे गटामधील वार-प्रतिवार


- आदिती तटकरे पालकमंत्री पदापासून दूर करण्यासाठी या तिघांनी अनेकवेळा पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. कालपरवा राजकारणात आलेल्या एका तरुणीच्या नेतृत्वाखाली हे अनुभवी लोकप्रतिनिधी काम करण्यास तयार नव्हते.

- भरत गोगावले हे तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलेले असतानाही खासदार सुनील तटकरे यांनी आपला राजकीय वजन वापरुन गोगावले यांना मंत्रिपदापासून दूर ठेवत आपल्या मुलीला मंत्री बनवले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या भरत गोगावले यांनी अखेर शिंदेसोबत बंड करून आदिती तटकरे मंत्रिपदापासून दूर करण्यात यश आले होते.

- भरत गोगावले मंत्रीपद मिळावे, यासाठी वर्षभरापासून फिल्डींग लावून होते. परंतु, कालच्या राजकीय घडामोडीनंतर भरत गोगावले यांना पुन्हा मंत्रिपदाची हुलकावणी मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Aditi Tatkare
Ajit Pawar Vs Sharad Pawar : तारीख ठरली, वेळ ही ठरली! अजित पवार अन् शरद पवारांच्यात कोण भारी 'इथे' ठरणार

जिल्हा नियोजनाची बैठक रद्द


गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्यात आली होती. या वर्षी देखील राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. त्यामुळे सोमवार (ता.३) होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक अचानक रद्द केली गेली आहे. आता ही बैठक नव्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. काही अपरिहार्य कारणाने जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंह मेहेत्रे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्या पाठीशी आहे. आम्ही कोणीही पक्ष सोडलेला नाही, आमची विचारधारा पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचीच राहील. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, त्यानुसार निवडणुका लढवल्या जातील.
- मधुकर पाटील, अध्यक्ष- रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मंत्रिपद मिळाल्याबद्दल आदिती तटकरे यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. परंतु, पुढील आठवडा भरातच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात माझी वर्णी लागणार असून रायगडचे पालकमंत्रीपदही माझ्याकडेच येईल, हे शंभर टक्के सत्य आहे.
- भरत गोगावले, आमदार, महाड विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.