हेल्मेट सिटबेल्ट न लावल्यास मॉल सोसायटीत ‘नो एन्ट्री’
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : बेशीस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागासह ठाणे शहर वाहतूक विभागाकडून जनजागृतीसह दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. असे असले तरी आजही अनेक वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना बगल देऊन वाहन चालवीत असतात. ही बाब लक्षात घेत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सरसावला असून दुचाकीवर हेल्मेट किंवा मोटर कार चालवताना सीटबेल्ट लावला नसल्यास प्रवेश बंदीचे फलक मॉल आणि गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच वाहतूक नियमभंग करणाऱ्या चालकाला प्रवेश बंदीची काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या आहेत. त्यामुळे आता हेल्मेट सीटबेल्ट न लावल्यास मॉल सोसायटीत नो एन्ट्री असणार आहे.
वाहन अपघातात छोटी चूक मृत्यूचा काळ बनून येत असली तरी वाहनचालक आजही वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसतात. अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचे धडे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात येत आहे. मात्र, तरी आजही अनेक वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना फाटा देण्यात येत आहे. त्याचा पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कडक धोरण राबवले आहे. दुचाकी आणि मोटर कार चालविणाऱ्या सर्वांना शिस्त लागावी याकरिता ठाणे शहरात जनजागृती केली जात आहे. गेल्या काही दिवसांत वाहन अपघताच्या मालिका सुरू आहेत. मात्र अपघाताचे सत्र कमी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात कोरम व्हिवियाना मॉल, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह याबरोबर मोठ्या गृहसंकुलात वाहनचालकांसाठी जनजागृतीचे फलक लावले आहेत. गृहनिर्माण सोसायटी किंवा मॉलमध्ये येताना किंवा बाहेर पडताना दुचाकीसाठी हेल्मेट आणि मोटर कार बसल्यावर सीटबेल्ट लावण्याचे बंधनकारक केले आहे. नियमांचे पालन करणाऱ्या चालकाला प्रवेश द्यावा, अशी सूचना संबंधित सुरक्षा रक्षक आणि सोसायटी कमिटीला दिल्या असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.
..................................
हेल्मेट आणि सीटबेल्ट असेल तरच प्रवेश... असे फलक प्रादेशिक परिवहन विभागाने तयार करून शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे हा प्रमुख उद्देश असून, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
- डॉ. विजय शेळके, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
........................................
दुचाकी चालवताना हेल्मेट आणि कारमध्ये बसल्यावर सीटबेल्ट लावणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. छोटासा अपघात जीवावर बेतण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. जनजागृतीसाठी आरटीओ ठिकठिकाणी सीटबेल्ट आणि हेल्मेट याबाबतचे फलक लावून चालकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत आहे.
- सुमन अग्रवाल, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.