ZP School News : खारघरमध्ये गळक्या छताखाली शिक्षणाचे धडे; फरशीपाड्यातील शाळेची दुरवस्था
खारघर : राज्यातील जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी शाळेत गुलाबाची फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे एकीकडे शाळेत मुलांची संख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत;
मात्र दुसरीकडे खारघर शहरातील फरशीपाडा वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छताला लागलेल्या गळतीत मुलांना शिक्षण घ्यावे लागत असल्याने जिल्हा परिषद अथवा पनवेल पालिकेने शाळा दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या खारघरमध्ये जिल्हा परिषद आणि खासगी अशा जवळपास शंभरहून अधिक शाळा आहेत. मात्र, खारघर सेक्टर ३४ लगत असलेल्या फरशी पाड्यातील मुलांना दोन किलोमीटर पायी जाऊन पेठगाव किंवा तळोजा गावात शिक्षण घ्यावे लागत होते.
त्यामुळे तत्कालीन जिल्हा परिषद सभापती बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नाने जुलै २०१० साली पाड्यात जिल्हा परिषदेची शाळा बांधण्यात आली होती. त्यावेळी ज्ञानदानाचे काम असल्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेश शेळके यांनी दहा बाय दहाची एक खोली विनामूल्य बांधून दिली होती.
पुढे विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यामुळे शेळके यांनी आणखी तीन खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आजच्या घडीला या शाळेत पहिली ते चौथीची ४१ मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळेची अवस्था अतिशय वाईट झाली असून छतावरील सिमेंटची पत्रे निखळले, तर भिंतीला तडे गेल्यामुळे शाळा धोकादायक बनली आहे.
विद्यार्थ्यांना अंधारातच शिक्षण
या शाळेत नव्वद टक्के मुले ही बहुभाषिक असून नाका कामगार, बांधकाम कामगार आणि घरकाम करणाऱ्या पालकांची मुले आहेत. या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. अशातच शाळेची इमारत धोकादायक, गळकी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारातच शिक्षण घ्यावे लागत आहे.
हद्दीच्या वादावरून दुर्लक्ष
ग्रामपंचायत असताना सत्ताधाऱ्यांनी या शाळेकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेकडून शाळा बांधकामासाठी निधी प्राप्त झालेला नाही. ही जागा सिडको हद्दीत असल्याचे सांगून शाळेच्या बांधकामासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत, पण अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याने जिल्हा परिषद अथवा पनवेल पालिका प्रशासनाने शाळा दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
एका ग्रामस्थाने दोन लाख रुपये खर्च करून शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, पालिकेने शाळा दुरुस्तीचे काम रोखल्यामुळे विद्यार्थ्यांना गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालिकेने सहकार्य करावे.
- मंजू पुजारी, पालक तथा सदस्य, ग्रामशिक्षण समिती, फरशीपाडा
शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इतर ठिकाणी पालिकेने जागा द्यावी यासाठी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जवळपास असलेल्या शाळेत विद्यार्थी स्थलांतरित करावे लागतील.
- सीताराम मोहिते, गट शिक्षणाधिकारी, जि. प. रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.