पालघर जलमय, वसई तुंबली!

पालघर जलमय, वसई तुंबली!

Published on

वसई, ता. २७ (बातमीदार) : मुसळधार पावसाने मुंबईप्रमाणेच पालघर जिल्ह्यालाही आज चांगलेच झोडपले. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला होता. त्यानुसार जिल्ह्याच्या सर्व भागात पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. विशेषतः वसई आणि पालघर तालुक्यात दमदार पाऊस झाला. वसईतील ससूनवघर, ससुपाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीची रखडपट्टी झाली. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमध्येही गुडघाभर पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मुसळधार पावसाने वसई तालुक्यातील देवतलाव, गिरीज, गास, सनसिटी-चुळणे मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात आले होते; तर पर्यायी मार्गांवरही पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. वसई पूर्वेकडील एव्हरशाईन, वसंत नगरी, आचोळे, वसई फाटा, नायगाव, विरारमध्येही अनेक सखल भागात पाणी साचले होते. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच महामार्गालगत असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेला कारवाईचे निर्देश दिले होते. आता पाणी साचल्याने बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे; तर मोखाडा तालुक्यात पिंजाळ नदी बंधाऱ्यावर पाणी आल्याने नागरिकांना रहदारीस अडचण आली. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली.

महामार्गावर १० किमीच्या रांगा
गुरुवारी सकाळपासून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतुकीला मोठा ब्रेक लागला. वसई येथे महामार्गावर पाणी आल्याने चिंचोटीपासून वर्सोवा पुलापर्यंत जवळपास १० किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे गुजरात, मुंबई, ठाणे दिशेला जाणाऱ्या वाहनांना पाच तासांहून अधिक वेळ कोंडीत अडकून राहावे लागले. यात अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका बसला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी सुहास चिटणीस यांनी दिली.

पालघरमध्ये दिवसभरात...
- धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडले
- पिंजाळ नदी ओव्हरफ्लो, बंधाऱ्यावर पाणी
- नागरिकांच्या सोयीसाठी बोटींची व्यवस्था
- वसईतील अनेक भागाला पाण्याचा वेढा
- मुंबई-अहमदाबाद महामार्ग ठप्प
----
एनडीआरएफचे २३ जवान, आपत्ती व्यवस्थापन पथक पावसाळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मोखाडा तालुक्यात पिंजाळ नदी बंधाऱ्यावर पाणी आल्याने नागरिकांसाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे
- गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.