बाप्पाला ‘बीज’मोदकाचा नैवेद्य

बाप्पाला ‘बीज’मोदकाचा नैवेद्य

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ ः पावसाळ्यात सर्वांना हवाहवासा वाटणारा सण म्हणजे गणेशोत्सव. बाप्पाच्या आगमनापासून अगदी विसर्जनापर्यंतचे सर्व नियोजन करतो. बाप्पाला नैवद्यात काय द्यायचे, काय नाही, हे तयार करण्यासाठी घरातील महिलांपासून सर्वांची लगबग सुरू असते. त्यामुळे यंदा पर्यावरणपूरक आरासबरोबरच मिठाईसोबत बीजमोदकाचा नैवेद्य देण्याचा संकल्प काही स्वयंसेवी संस्थांनी केला आहे.
गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देण्यावर सर्वच मंडळांचा भर असतो. या सणाच्या माध्यमातून समाजातील विविध बदलांचे प्रतिबिंबच पडत असते. सध्या पर्यावरण संवर्धन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न स्वयंसेवी संस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे बाप्पाची मूर्ती पर्यावरणपूरक असण्यावर भर देताना नैवद्यातून वनराई फुलवण्याचा अनोखा संकल्प करण्यात आला आहे. नवी मुंबईतील प्रभात ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी सर्वच गणेशोत्सव मंडळांनी बीजमोदकाच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
-----------------------------------
नाका कामगार महिलांना रोजगार
- डॉ. प्रशांत थोरात यांनी स्थापन केलेल्या प्रभात ट्रस्टमार्फत चालवल्या जाणाऱ्या महिला बचत गटामार्फत बीज मोदकाच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिले गेले आहे. मातीच्या सुकवलेल्या मोदकाच्या आकारात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा आणि फळांच्या बियांचा वापर करून डोंगररांगांमध्ये त्याचे रोपण केले जाणार आहे.
- बीजमोदकांच्या माध्यमातून घरगुती आणि नाक्यावर कामाच्या शोधात असणाऱ्या महिलांना रोजंदारी प्रभात ट्रस्टमार्फत उपलब्ध झाली आहे. घणसोली, कोपरखैरणे आणि नोसिल नाका येथील महिलांना बीजमोदक तयार करण्याचे काम प्रभात ट्रस्टतर्फे देण्यात येते.
- आत्तापर्यंत ट्रस्टने २० हजार मोदक तयार केले आहेत. एका मोदकामार्फत महिलांना तीन रुपये दिले जाते. दिवसभरात २०० ते ३०० मोदक तयार करता येते. त्याकरिता ट्रस्टतर्फे महिलांना प्रशिक्षण व साहित्य दिले जाते.
- डॉ. अश्लेषा थोरात या महिलांना प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरण करत आहेत. या कामात त्यांना प्रशिक्षिका संगीता मोहिते आणि ट्रस्टचे सदस्य वृक्षमित्र जीवन निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
----------------------------------
पंधरा दिवसांमध्ये अंकुर
डोंगररांगेत एकदा मोदक मातीमध्ये टाकला की पंधरा दिवसात अंकुर फुटतो. सध्या पावसामुळे डोंगररांगामध्ये गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोदकाला फुटलेला अंकुराचे वातावरणानुसार रोपटे तयार होते. या मोदकात माती, सेंद्रिय खत, बियाणे आणि सुती कापडाचा वापर केला असून पाच मिनिटांमध्ये माती, शेणखत, बियाणे टाकून मोदक तयार केले जात आहेत.
---------------------------------
हिरवाई फुलवण्यासाठी बीजमोदक ही महत्त्वाची संकल्पना आहे. या संकल्पनेतून ओसाड परिसरामध्ये पुन्हा हिरवळ फुलवण्यास मदत होऊ शकते. प्रभात ट्रस्टतर्फे यासाठी गणेश मंडळांना आवाहन केले गेले आहे.
- डॉ. प्रशांत थोरात, संस्थापक, प्रभात ट्रस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()