साडेबारा टक्क्यांमुळे कौटुबिंक कलह

साडेबारा टक्क्यांमुळे कौटुबिंक कलह

Published on

उरण, ता. ३ (बातमीदार)ः विकासाच्या दृष्टीने उरण तालुका आजच्या घडीला चांगलीच झेप घेत आहे. या भागातील बऱ्याचशा जमिनी सिडको प्रकल्पांसाठी गेल्यामुळे साडे-बारा टक्क्याअंतर्गत जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. शिवाय विमानतळामुळे असलेल्या जमिनींचे भाव गगनाला भिडल्याने खासगी विकासकांना हाताशी धरून जमिनी विकल्या जात आहेत. त्यामुळे एकीकडे उरण तालुक्यावर लक्ष्मीची कृपा झाली असली तरी दुसरीकडे या पैशांच्या मोहातून रक्ताच्या नात्यांमधील दुराव्यामुळे कौटुंबिक कलह वाढले आहेत.
उरण शहराच्या जोडीला उरण तालुक्याअंतर्गत येणारी गावेही सध्या चांगलीच प्रकाश झोतात आहेत. यासाठी तालुक्यात होणारे विकासात्मक बदल, जेएनपीटी बंदरामुळे गोदाम व्यवसायाला आलेली उभारी, त्यातून निर्माण झालेल्या रोजगारामुळे तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. या विकास प्रकल्पांमध्ये ज्यांच्या जमिनी सिडकोने घेतल्या आहेत. त्यांना २०१० पासून साडेबारा टक्के अंतर्गत पनवेल तालुक्यातील वहाळ, न्हावे, बंबावी पाडा, वडघर, पेंधर, नावडे, खारकोपर, काळुंद्रे, कोपर, तळोजा, पाडेघर, गव्हाण, भेंडखळ, नवघर, पागोटे, करळ, सोनारी, सावरखार, जसखार येथील नागरिकांना उलवे, नावडे, नवघरनजीक भूखंड देण्यात आले आहेत. मात्र, सात-बाऱ्यावर एका व्यक्तीव्यतिरिक्त तीन ते चार किंवा अधिक व्यक्तींची नावे असल्यामुळे पैशांच्या मोहातून रक्ताच्या नात्यांमध्येच दुरावा आला आहे.
------------------------------------------------------
अनेक घरे दुभंगली
- काही ठिकाणी बहिणीला किंवा मुलीला हक्क मिळू नये, म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सात-बाऱ्यावरूनच त्यांची नावे काढून टाकण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. या वादामुळे आज सख्खे बहीण-भाऊ, भाऊ-भाऊ एकमेकांचे वैरी झाले आहेत. काही ठिकाणी असे प्रश्न सामंजस्याने सोडवले जात आहेत. मात्र, त्याचे प्रमाण फारच नगण्य असल्याने अनेक घरे दुभंगली आहेत.
- उरण तालुक्यात विकासात्मक प्रकल्पांमुळे, तसेच येणाऱ्या साडेबारा टक्के जमिनीमुळे पैशांची रेलचेल आहे. प्रत्येक भूखंड हा करोडोंच्या घरात विकला जात आहे. मात्र आज या पैशांमुळे सख्ख्या नात्यात पूर्वीसारखा ओलावा राहिला नसल्याने प्रेमाची जागा कौटुंबिक कलहांनी घेतली आहे.
- अनेक सात-बाऱ्यावर लग्न झालेल्या मुलींची व बहिणींची नावे असल्यामुळे, साडेबारा टक्क्यांवर मिळणाऱ्या प्लॉटवर त्यांचीही नावे आहेत, पण लग्न झालेल्या मुली, तसेच बहिणी आपला हक्क सोडत नसल्यामुळे बहीण-भावांच्या नात्यांमधील कलह आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
-----------------------------------------
वर्षभरात ५० ते ६० दावे
सरसरी वर्षात उरण परिसरातील बहीण-भावांचे प्रॉपर्टी संबधित ५० ते ६० तरी दावे कोर्टात दाखल होतात. प्रॉपर्टी संबधित वादाची प्रकरणे पोलीस स्टेशनला न जाता दिवाणी कोर्टात दाखल होतात.
--------------------------------------------------
आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलीचाही हक्क असल्याचे कायद्याने मान्य केले आहे. मात्र, हाच हक्क माहेरच्या माणसांची पोटदुखी बनला आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे या वादातूनच माहेरी पाऊल ठेवले नाही.
- मनीषा म्हात्रे, उरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com