गृहनिर्माण प्रकल्पांवर ‘महारेरा’चे बारकाईने लक्ष

गृहनिर्माण प्रकल्पांवर ‘महारेरा’चे बारकाईने लक्ष

Published on

मुंबई, ता. १० ः महारेराकडे नोंदणीकृत असलेल्या गृहनिर्माण आणि वाणिज्यिक प्रकल्पांचे सूक्ष्म संनियंत्रण करण्यासाठी अनुपालन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष अधिक सक्षम आणि प्रभावी करून महारेरा गृहनिर्माण प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी महारेराने पूर्वीच्या अन्वेषकांशिवाय जास्तीत जास्त प्रकल्पांची ‘सद्यस्थिती आणि सत्यस्थिती’ पूरक छायाचित्रे व आवश्यक अहवालासह वेळोवेळी उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या तज्ज्ञ यंत्रणेची मदत घेण्याचे ठरवले आहे.

महारेराची यंत्रणा सुरुवातीला राज्यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकल्प ज्या क्षेत्रात आहेत त्या मुंबई महानगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या भागांतील तपशील उपलब्ध करून देणार आहे. भविष्यात अडचणीत येऊ शकणारे प्रकल्प शोधून त्याचे नियमित संनियंत्रण करणे, रद्द झालेल्या प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणे, विकसकांनी तिमाही आणि वार्षिकरीत्या संकेतस्थळावर अद्ययावत करायच्या माहितीचा सतत पाठपुरावा करून विनियमन तरतुदींचे नियमित पालन होईल हे पाहणे इत्यादी अनेक महत्त्वाची कामे अनुपालन कक्षाद्वारे केली जातात. सद्यःस्थितीत संबंधित विकसकांकडून प्रकल्पाचा समग्र तपशील असलेले तिमाही व वार्षिक अहवाल नियमितपणे उपलब्ध व अद्ययावत होणे गरजेचे असते. येणाऱ्या माहितीबद्दल काही साशंकता असल्यास ते पडताळून घेण्याची सोय महारेराकडे नाही. त्यासाठी कक्षाला संबंधित प्रकल्पांची सद्यःस्थिती आणि सत्यस्थिती उपलब्ध होणे ही प्राथमिक गरज आहे. त्याबाबतची माहिती मिळायला सुरुवात झाल्यानंतर रद्द झालेल्या प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने विविध वर्गवाऱ्या करता येतील.


सर्व माहितीची पडताळणी होणार
भोगवटा प्रमाणपत्र मिळून घर खरेदीदारांना ताबा दिलेले प्रकल्प, भोगवटा प्रमाणपत्राशिवाय घरांचा ताबा घेतलेले प्रकल्प, धीम्या गतीने सुरू असलेले, काम बंद पडलेले किंवा विकसकाने अर्धवट सोडलेले प्रकल्प इत्यादी वर्गवारी करून पुढील नियोजन करता येणार आहे. त्यासाठी ज्यांच्याकडून माहिती येत नाही त्यांचीही झाडाझडती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ठोस माहिती महारेराकडे उपलब्ध होणे गरजेचे आहे. बाह्य यंत्रणा अशी माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देणार आहे. तिची पडताळणी करून सर्व प्रकल्पांचा ग्राहकांना फायदा होईल अशा पद्धतीने सूक्ष्म संनियंत्रण करण्याचा महारेराचा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.