नवी मुंबईकर मलेरीया-डेंगीने बेजार

नवी मुंबईकर मलेरीया-डेंगीने बेजार

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ ः पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नवी मुंबई शहरात मलेरिया आणि डेंगी यांसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या दहा दिवसांमध्ये मलेरियाचे १० रुग्ण, तर जुलै महिन्यात १८५ संशयित डेंगी रुग्णांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले आहेत. झोपडपट्टींबरोबर सिडकोनिर्मित वसाहतींमध्ये मलेरिया आणि डेंगीचे संशयास्पद रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
पावसाळा सुरू झाला की कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागते. पावसाचे पाणी साठून डासांच्या अळ्या वेळेवर नष्ट केल्यास उत्पत्ती होत नाही. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत ज्या भागात बांधकाम, अस्वच्छता आहे, अशा परिसरामध्ये डेंगी आणि मलेरियाच्या संशयित रुग्णांची संख्या जास्त आहे. या साथीच्या आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे नवी मुंबई महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बेलापूर नोडमध्ये आग्रोळी आणि दिवाळे गावात मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. नेरूळ नोडमध्ये दारावे, करावे, सारसोळे, कुकशेत या गावांमध्ये डासांचा त्रास नागरिकांना जाणवत आहे. शहरातील गावठाणांसोबत सिडकोनिर्मित सोसायट्या, खासगी विकसकांच्या गृह सोसायट्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
----------------------------------------------
डासांवर नियंत्रण मिळवण्यात अपयश
- कांदळवने आणि उद्यानाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना डासांचा अधिक त्रास जाणवत आहे. अशी ठिकाणे शोधून डासआळी नष्ट करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्याचे कामही महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. मात्र अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे.
- नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात १८५ डेंगी संशयित रुग्णांचे नमुने महापालिकेला सापडले आहेत; तर १४ रुग्ण मलेरियाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट महिन्यामध्येही मलेरियाच्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. १ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत मलेरियाचे १० रुग्ण सापडले आहेत. काही डेंगीचे संशयित रुग्णही आढळून आले आहेत.
--------------------------------------
खासगी रुग्णालयांवरही ताण
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार ताप येणाऱ्या व्यक्तीचे नमुने घेऊन ते पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवून दिले जातात. या नमुन्यांचा अहवाल बाधित असल्यानंतर महापालिकेतर्फे अधिकृतरीत्या डेंगीचा रुग्ण म्हणून जाहीर केला जातो. मात्र, याकरिता १० ते १५ दिवसांचा वेळ जात असल्याने बऱ्याचदा रुग्ण बरा होऊन गेल्यानंतर डेंगीबाधित असल्याचे समजते. तोपर्यंत खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेण्यावर भर दिला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.