उरण तालुक्याला निसर्गाचे वरदान
उरण, ता. १६ (बातमीदार)ः पावसाळ्याच्या दिवसात उरण परिसरातील द्रोणागिरी, कळंबुसरे, इंद्रायणी, चिरनेर परिसरातील आक्कादेवी, पाले गावचा डोंगर, सारडे घोल, पुनाडे डोंगर परिसरात रानफुलांना चांगलाच बहर आला आहे. संततधार पडणारा पाऊस, तसेच पावसाळी वातावरणात उरण तालुक्यावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केल्याचे दिसून येत आहे.
पर्यावरणाच्या विविधतेने उरण तालुक्यातील जंगले समृद्ध झाली आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर उरण परिसरातील माळरानावर, डोंगरावर विविध प्रकारची सुंदर दिसणारी रानफुले, वनस्पती मनाला भुरळ घालत आहेत. अशातच श्रावण महिन्यात विविध रानफुलांना बहर आला असून विविध धार्मिक सणांमध्ये या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तेरडा, हळदीकुंकू, माक्याचे फूल, अग्निफुले मुबलक प्रमाणात असल्याने अतिशय विलोभनीय दृश्य दिसत आहे. त्याशिवाय कुसुम, कर्णफुल, सीतेची वेणी, अंजनी, भारंगी, कुड्याची, कर्टुल्याची फुले, शेरवड अशा विविध फुलांमुळे माळराने बहरलेली आहेत.
--------------------------------------
डोंगरावर विविध गवती फुले, रानफुले बहरली आहेत. उरणच्या डोंगरावर रानफुलांचा पावसाळ्यातील बहर म्हणजे नैसर्गिक देणगी आहे. विविध रंगांची ही फुले आकर्षक आहेत. या निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागाचे संवर्धन करायला हवे.
- धीरज भोईर, निसर्गप्रेमी
---------------------------------------------------
पावसाळ्यात डोंगरावर उगवणारी विविध रंगांची फुले ही निसर्गाची किमया आहे. निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे.
- सागर वर्तक, निसर्गप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.