लक्ष्मी नारायण मंदिर
प्रसाद जोशी, वसई
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिममध्ये पुरातन लक्ष्मी-नारायण मंदिर आहे. या मंदिरावर करण्यात आलेली नक्षीदार कलाकुसर भाविकांना आकर्षित करते. या ठिकाणी श्रावण महिन्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच महिनाभर भाविकांची रीघ लागलेली असते. तसेच साजरा होणारा श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उत्सव भक्तांचा आनंद द्विगुणित करतो.
वसईला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तालुक्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे पेशवेकालीन आहेत. या मंदिरांवर असलेले सुबक नक्षीकाम भाविकांना आकर्षित करते. त्यातीलच एक मंदिर म्हणजे लक्ष्मी नारायणाचे मंदिर होय. हे मंदिर पुरातन असून या ठिकाणी वर्षभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. नालासोपारा पश्चिम येथे चौकावर असलेल्या मार्गाला लागूनच हे मंदिर उभे आहे.
लक्ष्मी-नारायण मंदिरात गोकुळाष्टमीचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्णाला पाळण्यात विराजमान केले जाते. विविध रंगी सुवासिक फुलांची आरास केली जाते. तसेच विविध फळांचा नैवेद्य दाखवला जातो. या वेळी वसई तालुक्यातून येणारे भाविक श्रीकृष्णाचे नामस्मरण करतात. श्रावण महिन्यात शुक्रवार, मंगळवार, शनिवार, रविवार, गुरुवारी भाविकांची गर्दी होत असते. ज्या भक्तांना भजन, नामजप करायचा असतो, ते या ठिकाणी येतात. या ठिकाणी नामजप केल्याने मनशांती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिरात लक्ष्मी नारायण, खोडियार माता, हनुमान, विठोबा-रखुमाई अशा देवदेवतांच्या मूर्ती आहेत. हनुमान जयंती, नवरात्रोत्सव, गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तसेच विठ्ठल-रखुमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. श्रावण महिन्यात लक्ष्मी-नारायणची पूजा-अर्चा केली जाते. या वर्षी जन्माष्टीमला रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या वेळी लहान मुले हंडी फोडणार आहेत. श्रीकृष्णाला पाळण्यात विराजमान केले जाणार आहे. तसेच महिला मंडळाचे भजन व अन्य उपक्रम असणार आहेत, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष परिमल दलाल व उपाध्यक्ष चेतन पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.