सोनपावलांनी आली गौराई
ठाणे, ता. २१ : लाडक्या गणरायापाठोपाठ लाड पुरवून घेण्यासाठी गौराईचे घरोघरी धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. ‘गौराई आली सोन पावलांनी... गौराई आली माणिक मोत्यांच्या पावलांनी’ म्हणत या माहीरवाशिनीच्या साजशृंगारासह तिचे लाड पुरवण्यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळत आहे.
ठाणे शहरासह पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये यंदा १४ हजार ८४५ गौरींचे आगमन झाले आहे. कोणाच्या घरी एक गौरी तर कोणाच्या घरी दोन गौरी व त्यासोबत त्यांची लहान मुले अशी गौराई बसविली जाते. ज्यांच्या घरी गौरी आणण्याची पद्धत आहे, तिथे बाप्पासोबत गौराईच्या आगमनाची तयारीही केली जाते. कुठे मुखवट्यांची गौरी, कुठे तेरड्याची, तर कुठे मूर्ती बसवण्याची पद्धत आहे. गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून गौरीच्या आगमनाची आणि तिला सजविण्यासाठी महिलांची लगबग दिसून आली. गौरीचे आगमन झाल्यानंतर तिला संपूर्ण घरात फिरवून घर दाखविण्यात आले. ही परंपरा पार पाडताना काही महिलांनी ‘गौरी गौरी कुठे आलात’ असे विचारून तर काही महिलांनी ‘मी माझ्या माहेरी आली’ ‘गौराई कशासाठी आली तर मी माझ्या पोराबाळांसाठी, गाई-वासरांसाठी आली’, ‘गौराई कोणाच्या घरी आली तर धन्याच्या घरी आली’ असे म्हणत गौरीचे स्वागत केले.
सजावटीला प्राधान्य
गौरीचे पारंपरिक पद्धतीने आणि सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले. गौरीला साजशृंगार करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेतले. आपली गौरी छानच दिसावी, ती सर्वांपेक्षा सुंदर दिसावी, असा अट्टहास महिला करताना दिसल्या. जरीपदराची साडी, बाजूबंद, लक्ष्मीहार, कमरपट्टा, बोरमाळ, तसेच विविध प्रकारचे दागिने घालून गौराईला सजवण्यात आले. गौरीसाठी घरोघरी पारंपरिक पद्धतीने छान आरास, सजावट केल्याचेही दिसून आले. काहींनी झोपाळ्यावर बसलेली गौरी, तर कोणी जात्यावरती धान्य भरताना दाखवलेल्या दोन गौरी असे वेगवेगळे प्रकार केले, तर काहींनी गावरान पद्धतीसारखे गौरीसमोर पायऱ्या करून त्यावर १५ ते २० असे खाद्यपदार्थ ठेवले आहेत.
काकडीचे वडे आणि वाट्याची उसळ
स्वागताच्या दिवशी सुका फराळ तिच्यासमोर ठेवण्यात आला आहे, पण उद्या शुक्रवारी तिची विधिवत पूजा झाल्यानंतर पुरण-पोळ्यांसह काकडीचे वडे, वाटण्याची उसळ, भोपळ्याची भाजी, नारळाच्या करंज्या, उकडीच्या करंज्या असा बेत घरोघरी आखण्यात आला आहे. ज्यांच्या घरी गणपती नाही, पण गौरी आहे, अशा काहींच्या घरी ‘तिखटा’चा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.
परिमंडळानुसार गौरी
ठाणे- १,७२६
भिवंडी- ५७३
कल्याण- ६१०७
उल्हासनगर- ४४४६
वागळे- १९९३
एकूण १४, ८४५
……
हिरव्या गौराईचे ग्रामीण भागात पूजन
वज्रेश्वरी (बातमीदार) : भिवंडी तालुक्यात हिरव्या गौरीचे थाटामाटात आगमन झाले. ग्रामीण भागात घरोघरी वेल-फुलांच्या या हिरव्या गौरींना थेट घरात आकर्षक आरास करून स्थान देण्यात आले. ही आरास शक्यतो महिला करतात. यात पाटावर चादर अंथरूण त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या झाड वेलींच्या गौरीचे स्वागत केले जाते. या हिरव्या गौराईला महिलांनी मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, नथ आदी आभूषणे घालून तिची पूजा केली जाते, अशी माहिती गणेशपुरी येथील रेणुका पाटील यांनी दिली.
…….
महिलांमध्ये उत्साह
मुरबाड (बातमीदार) : तालुक्यात फुलांच्या गौराईचे पारंपरिक पद्धतीने उत्साहात आगमन झाले. दरवर्षी सायंकाळी गौरीचा आगमन सोहळा पार पडतो. या वर्षी मात्र दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गौरीच्या आगमनाचा मुहूर्त असल्याने गृहिणीची धावपळ उडाली. घरातील लहान मुलांनी डोक्यावर टोपी घालून बांबूच्या टोपलीमध्ये ठेवलेली गौराई दारात आणली आणि सुवासिनींनी तिची विधिवत पूजा करून तिला घरामध्ये विराजमान केले. मुरबाड तालुक्यात सुमारे सहा हजार घरांमध्ये गौरींचे आगमन झाले आहे.
….
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.