मलबारहिल जलाशय पुनर्बांधणीला विरोध

मलबारहिल जलाशय पुनर्बांधणीला विरोध

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे. पुनर्बांधणीमुळे सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढणार आहे. या कामासाठी सुमारे ६९५ कोटी रुपये खर्च केला जाणार असून, या कामात सुमारे ४०० झाडांचा अडथळा येत आहे. त्यापैकी १८९ झाडे कापावी लागणार आहेत; परंतु स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेत ही झाडे कापण्यासह या प्रकल्पालाच विरोध केला आहे.
मलबार हिल जलाशय हा दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन १३५ वर्षे जुना आहे. या जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे.
नवीन जलाशयातून कुलाबा, फोर्ट, कफ परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, सँड हर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड आणि ग्रँट रोडमधील पालिकेच्या प्रभागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्यातही सुधारणा होणार आहे. पालिकेने २०० झाडांचे फिरोजशहा मेहता उद्यानात (हँगिंग गार्डन) पुनर्रोपण प्रस्तावित केले आहे; मात्र रहिवाशांनी या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होण्याची भीती व्यक्त केली आहे. येथील झाडे खूप जुनी असून त्यांचे जतन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच हँगिंग गार्डन आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला हात लावू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------
पर्याय सूचवा : पालकमंत्री
१) नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता प्रकल्पासाठी पर्याय शोधा, असे निर्देश स्थानिक आमदार व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेला दिले आहेत. तसेच रहिवाशांनाही पर्यायी योजना सुचवण्याचे आवाहन केले आहे. जलाशयाची नवीन टाकी इतर ठिकाणी बांधता येईल, असा पर्यायही सुचवण्यात आला आहे.
२) जलाशय १४० वर्षे जुना आहे. आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे. खालील जागेत जलाशय बनवणे शक्य आहे का, यासाठी देश-परदेशातून नवीन तंत्रज्ञान शोधण्याची आवश्यकता आहे, तसे निर्देशही पालकमंत्री लोढा यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान याबाबत पुढील बैठक २६ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती रहिवाशांकडून देण्यात आली आहे.

------------
कोस्टल रोड उद्यानाचा पर्याय?
सागरी किनारा मार्गात (कोस्टल रोड) मरिन ड्राईव्हपासून काही अंतरावर सुमारे ६० ते ७० एकर मोकळी जागा निर्माण होणार आहे. तसेच तेथे उद्यान बांधले जाणार आहे. या जागेत मलबार हिल नवीन जलाशय बांधता येईल का, असा विचार पालिकेतर्फे सुरू असल्याचे समजते. कोस्टल रोडचे प्रस्तावित उद्यान हे जुन्या जलाशयाच्या तुलनेत ५० ते ६० फूट खालच्या भागात आहे. येथे जलाशय बांधल्यास ते किती उपयुक्त ठरेल, याची चाचपणी केली जात असल्याचेही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.