आरे कॉलनीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा

आरे कॉलनीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होते. विसर्जना सुरळीत व्हावे म्हणून गोरेगाव आरे कॉलनीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, अशी मागणी भाजपने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.
आरे कॉलनीत गोरेगाव (पूर्व-पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व), अंधेरी (पूर्व), मालाड (पूर्व) इत्यादी भागांतील गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. दर वर्षी आरे वसाहतीमधील तीन मोठे तलाव आणि कृत्रिम स्थळी विसर्जन होते. यंदा मात्र न्यायालयीन आदेशानुसार आरे वसाहतीमधील तीनही तलावांमध्ये विसर्जनासाठी मनाई करण्यात आली आहे. पालिकेने कृत्रिम तलावासाठी वसाहतीच्या कार्यकारी अधिकाऱ्याकडे परवानगी मागितली होती. त्यांनी परवानगी नाकारल्याने भाजपने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर न्यायालयाने कृत्रिम तलाव उभारणीस परवानगी देताना त्याबाबतचा निर्णय पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समितीच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश दिले.
गेल्या वर्षी ३,४३१ घरगुती आणि सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन आरे वसाहतीतील तीन नैसर्गिक तलाव आणि सात कृत्रिम ठिकाणी झाले होते. गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६९७ घरगुती आणि २०१ सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा एकमेव कृत्रिम तलाव उपलब्ध आहे. सहा छोटे कृत्रिम तलावही आहेत. मात्र ती व्यवस्था विसर्जनासाठी पुरेशी पडणार नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उभारावेत, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

मत्स्यदंशापासून सावध
ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यानच्या कालावधीत मुंबईतील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ इत्यादी प्रजातींच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. १०८ क्रमांकाची एक रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.