‘लोकमुद्रा’मुळे वंचित मुले शिक्षणाच्या प्रवाहात
कळवा, ता. ५ (बातमीदार) : पारसिक डोंगरपायथ्याच्या वाघोबानगर परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या व पोटाची भूक भागविण्यासाठी पाठीवर बिऱ्हाड घेऊन आलेल्या कुटुंबांची संख्या हजारोंच्या पटीने आहे. दिवसभर मोलमजुरी व बिगारी काम करून ही कुटुंबे उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे त्यांची मुले ही शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत. अशा वंचित घटकातील मुलांसाठी लोकमुद्रा बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था आधार ठरत आहे. या संस्थेने ‘युवामुद्रा’ अशी टॅगलाईन सुरू करून या मुलांना शिक्षणातून लोकशाहीच्या मूल्यांचे शिक्षण देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
ठाण्यातील कळवा परिसरातील पारसिक डोंगरपायथ्याच्या वाघोबानगर परिसरातील शाळाबाह्य मुलांना शांतीनगर येथील एका बौद्ध विहारात एकत्र आणून लोकमुद्रा संस्थेचे सदस्य त्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. भारताचा एक चांगला नागरिक तयार करण्यासाठी त्यांना भारताचे संविधान, व्यक्तिमत्त्व विकास, विविध भाषा सौंदर्य, निसर्गाचे आणि स्वच्छतेचे महत्त्व, दैनंदिन व्यवहारातील गणित, पोलिसांचे कायदे याची माहिती दिली जात आहे. यात मुलांना त्यांच्या वयानुसार रोजगार कसा मिळवावा, तसेच मुलींना गुड आणि बॅड टच याबाबत मार्गदर्शन दिले जात आहे. संस्थेच्या वतीने शनिवार आणि रविवार या दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळेत प्रथम प्रार्थनेने या वर्गाला सुरुवात होते. या केंद्रात शाळेत न जाणारी मुले, मजुरी करणारी निराधार मुले अशी शाळाबाह्य मुले येतात. यामध्ये १९ ते २२ वयोगटातील मुलांचे प्रमाण जास्त आहे. संस्थेच्या वतीने मुंबई विद्यापीठात जर्नालिझम व मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेणारी पूनम कुरील ही तरुणी हे शिक्षण परिवर्तनाचे सामाजिक काम करीत आहे.
…..
सकारात्मक बदल
संस्थेचे काम सुरू असताना काही विवाहित तरुणींमध्ये सकारात्मक बदल घडून आला आहे. यात रहिमा शेख या विवाहित तरुणीला आपली सासू व जाऊबाई शिक्षण घेण्यासाठी जाते म्हणून त्रास देत होती; परंतु या केंद्रातून तिला कायद्याचे ज्ञान मिळाल्याने अर्धवट शिक्षण न सोडता जिद्दीने स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून तिने मोठी हिंमत करून आपल्या आईकडे राहून दहावीची परीक्षा पास झाली आहे.
…..
समाजातील वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मला संधी मिळाली आहे. या मुलांबरोबर हसतखेळत शिकवताना खूप आनंद मिळतो.
- पूनम कुरील, केंद्र समन्वयक व शिक्षिका
…..
भारतीय संविधान मूल्याचा आधार घेऊन वंचित घटकातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटावे व त्यांच्यातून भारताचा चांगला नागरिक घडावा, या हेतूने हा उपक्रम राबविले जात आहे.
- मंगेश निकम, अध्यक्ष, लोकमुद्रा बहुउद्देशीय विकास संस्था
……
कळवा : वंचित घटकांतील मुलांना लोकमुद्रा संस्थेकडून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.