प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना

प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : शहरातील विविध भागांत सुरू असलेली बांधकामे, तसेच मेट्रोची कामे यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरातील हवेचा दर्जा घसरला आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची दखल घेत पालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दोन विकासकांना आणि एका आरएमसी प्लान्टला नोटीस बजावली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत प्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
मुंबईची हवा मागील काही दिवसांपासून प्रदूषित झाल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. अशात मुंबई शहराला लागून असलेल्या ठाणे शहराच्या हवेची पातळीदेखील घसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार शहरातील विविध भागांत ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक १४५.५ इतका नोंद झाला असून प्रदूषणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे पालिका हद्दीत घोडबंदर, कोलशेत, बाळकूम, वर्तकनगर, पोखरण रोड आदींसह शहराच्या इतर भागांत गृहसंकुलांची सुरू असलेली कामे, त्यामुळे या ठिकाणी धूळ प्रदूषण रोखण्यासाठी विकासकांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. त्याचा त्रास ठाणेकर नागरिकांना सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करता पालिका प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता शहरातील दोन नामांकित विकासकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच एका आरएमसी प्लान्टला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती महापालिकेने दिली. तसेच वाढत्या प्रदूषणाची पातळी रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

................................
असा आहे हवेचा स्तर
महापालिकेच्या प्रदूषण विभागाने त्यांच्या अॅपवर प्रसिद्ध केलेल्या माहितीत तीन हात नाका येथे सर्वाधिक हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची १६० इतकी नोंद झाली. धूलिकणांचे प्रमाण हे १९० इतके आढळून आले. सर्वात कमी प्रदूषण हे व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट नौपाडा परिसरात १२० हवेचा गुणवत्ता निर्देशांक आढळून आला असून तेथील धूलिकणांचे प्रमाण १३० इतके आहे. औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अ‍ॅण्ड कंपनी अंतर्गत वर्तक नगर आदी ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२४ आढळून आला असून धूलिकणांचे प्रमाण १३५ आहे. निवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३८ असून धूलिकण प्रमाण १५७ इतके आहे.

….
अन्यथा कडक कारवाई
मार्गदर्शक सूचनांमध्ये विकसकांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करावी, रस्त्यावर माती येणार नाही, याची काळजी घ्यावी, रस्त्यावर धुळीचे प्रदूषण होणार नाही, या दृष्टीने काळजी घ्यावी, आरएमसी प्लान्टच्या ठिकाणी विविध स्वरूपाच्या उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.