टीसी की रील्स स्टार?

टीसी की रील्स स्टार?
Published on

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : लोकलमध्ये २४ तास राहण्याचा विक्रम करण्यासाठी चक्क तीन तरुणांनी कारशेडमध्ये मुक्काम केल्याची घटना ताजी असताना पश्चिम रेल्वेच्या दोन तिकीट तपासणीसांच्या प्रतापाने रेल्वे प्रवाशांना धक्का बसला आहे. कर्त्यव्यावर असलेल्या दोन तिकीट तपासणीसांनी मुंबईतील एका दिवंगत डॉनच्या डायलॉगवर रील्स केली. त्यांना हजारोंच्या घरात लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर रील्स काढणाऱ्या तरुणांना कसे थांबवावे, या विचारात असलेल्या रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी आता या टीसींनी वाढवली आहे.
समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण पिढी धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना दिसते. लोकलच्या गर्दीचा फायदा उचलून धावत्या लोकलमध्ये डान्स करण्याचे प्रकार आता नवीन राहिले नाहीत. यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. सोबत कामात व्यत्यय येतो. या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न रेल्वेकडून होतो आहे; मात्र ‘दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ ही म्हण रेल्वेचे कर्मचारीच कृतीत उतरवत आहेत.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील एका टीसीने रेल्वेस्थानकांवर रील्स बनवून समाज माध्यमांवर टाकण्याचा सपाटा लावला आहे. संबंधित टीसीच्या अकाउंटवर लाईक्सचा पाऊस पडत असताना रेल्वे प्रशासनाला याची माहितीच नाही. रेल्वेचे ओळखपत्र आणि शर्टच्या दोन गुंड्या उघड्या ठेवून ही तरुण मंडळी रील्स तयार करतात. त्यामुळे हे रेल्वे टीसी आहेत की अभिनेते, हेच कळत नाही. या प्रकारावर प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांना ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने पाठवला; मात्र त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
...
कारवाई होणार का?
धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना सेल्फी घेणे, रील्स बनवणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे अशा कृती करणाऱ्यास रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार दोषी मानले जाते. त्यानुसार रेल्वेकडून कारवाई केली जाते. मात्र हा नियम फक्त सर्वसामान्य प्रवाशांना लागू आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे टीसीवर कारवाई करणार का, हा प्रश्न आहे.
...
रेल्वे प्रशासनाचे प्रवासी सुरक्षेवर लक्ष नाही. स्वतःचे कर्मचारी कर्तव्यावर असताना रील्स बनवत असतील, तर हे खूप धक्कादायक आहे. रेल्वे परिसरात आणि रेल्वे गाड्यांत रील्स बनवणाऱ्यांवर रेल्वेने कारवाई करावी.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ
.......
या कर्मचाऱ्यांनी खरे तर असे प्रकार रोखले पाहिजेत. मात्र हे सर्व विसरून टीसी असले रील्स काढत असतील तर रेल्वे प्रशासन कोणत्या तोंडाने इतर प्रवाशांना असे करू नका, असा उपदेश करणार आहे? यातून चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून या टीसींना समज देऊन कारवाई करायला हवी.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.