श्वानांच्या नैसर्गिक विधींमुळे नागरिक त्रस्त

श्वानांच्या नैसर्गिक विधींमुळे नागरिक त्रस्त

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : पाळीव श्वानांकडून उघड्यावर केल्या जाणाऱ्या नैसर्गिक विधींमुळे सकाळी फिरायला जाणारे नागरिक हैराण झाले आहेत. सीबीडी-बेलापूर, नेरूळ, सीवूड्स, वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली या भागात श्वानांच्या मलमूत्राचा त्रास वाढला आहे. त्यावर उपाय म्हणून पाळीव श्वानांच्या मालकांना स्वतःजवळ मलमूत्र भरण्याचे साहित्य (पुप स्कुपर) बाळगण्याबाबत महापालिकेने आवाहन केले आहे. तसेच उद्यानांमध्ये डॉगपार्कही निर्माण केले आहे. परंतु, श्वानांचे मालक याचा वापर करत नसल्याने उघड्यावरच मलमूत्र टाकून दिले जाते. परिणामी, रोगराई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
थंडीचा महिना सुरू झाल्याने सकाळच्या थंडगार वातावरणात स्वच्छ हवेचा लाभ घेण्यासाठी नोकरदार वर्ग आणि अनेक नागरिक घराबाहेर पडतात. शेजारच्या उद्यानात अथवा जॉगींग ट्रॅकवर जाऊन व्यायाम करतात. याच दरम्यान पाळीव श्वानांना फेरफटका मारण्यासाठी अनेक श्वानप्रेमीही आलेले असतात. बेलापूरपासून ते दिघापर्यंतच्या सर्वच नोडमध्ये सकाळी आणि संध्याकाळी उद्यानांमध्ये व्यायाम करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. या भागात काही ठिकाणी महापालिकेने उद्यानांमध्ये डॉगपार्क तयार केले आहेत. या पार्कमध्ये पाळीव श्वानांसाठी नैसर्गिक विधी करण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा वापर अनेक श्वानमालक करताना दिसत नाही. श्वानाला बाहेर आणल्यानंतर रस्त्यावर अथवा पदपथावर मिळेल त्याठिकाणी ते नैसर्गिक विधी करत असतात. हा मल भरण्याऐवजी तसाच उघड्यावर ठेवून श्वानमालक निघून जातात. परिणामी त्या भागात दुर्गंधी सुटते. सकाळच्या वेळेस हवा थंड असल्याने उद्यानात अथवा रस्त्यावर खूप उग्रवास येत असतो. त्यामुळे अशा श्वानमालकांवर करावाई करावी, अशी मागणी सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांच्याकडे संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

रोज सकाळी सोसायटीबाहेरच्या रस्त्यावर आणि उद्यानात फिरण्यासाठी जातो. त्या ठिकाणी काही श्वानप्रेमी त्यांच्या पाळीव श्वानांना घेऊन येतात. सकाळच्या वेळेस श्वानांनी केलेली नैसर्गिक विधी तशीच सोडून ते निघून जातात. त्यामुळे दुर्गंधी येत असून रोगराई पसरण्याची भीती वाटते.
- रजनी, नेरूळ, रहिवासी

महापालिकेकडून कारवाईची तरतूद
पाळीव श्वानांकडून अस्वच्छता केल्यास त्याच्या मालकाला पहिल्यांदा शंभर रुपये दंड आकारला जातो. पुन्हा त्याच श्वानाने नियमाचे उल्लंघन केल्यास दुसऱ्यांदा २५० रुपये दंड आकारला जातो. श्वान पाळत असल्यास अशा मालकाला परवाना घेण्याचे आवाहन केले जाते. परवाना न घेता श्वानाचे पालन केल्यास संबंधित श्वानाला पकडून कोंडवाड्यात ठेवले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.