Thane: प्रवाशांची वाट अडवतोय रिक्षावाला ! वाटमारी करणाऱ्या रिक्षांवर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : रेल्वेस्थानक परिसरातील सॅटीस पुलाखालील फेरीवाला हटवत ठाणे पालिका प्रशासनाने प्रवाशांसाठी हा परिसर मोकळा केला आहे. असे असले तरी दुसरीकडे बेशिस्त रिक्षाचालकांकडून प्रवाशांची वाटमारी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना ये-जा करण्यासाठी फेरीवालामुक्त केलेल्या परिसराचा ताबा रिक्षाचालकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी चालक बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करीत प्रवासी भाडे घेतात, तेथून वाहतूक पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर आहे. तरीही हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अशा बेशिस्त आणि प्रवाशांची वाटमारी करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून केली जात आहे.
ठाणे रेल्वेस्थानक हे ऐतिहासिक रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी कामानिमित्त प्रवास करीत असतात. अनेक प्रवासी घरापासून ते ठाणे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी बस, रिक्षा अथवा दुचाकीचा वापर करीत असतात. यामध्ये रिक्षा आणि सार्वजनिक बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सॅटीस पुलाखाली रिक्षांकरिता स्वतंत्र थांबा देण्यात आला आहे.
याच परिसरातून रिक्षाचालकांनी प्रवाशांची वाहतूक करणे अपेक्षित आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून काही रिक्षाचालक थांबा सोडून इतरत्र रिक्षा उभ्या करित आहेत. यामध्ये ठाणे शहराच्या बाहेर प्रवासी भाडे घेऊन जाणाऱ्या रिक्षांसह शेअरवर चालविण्यात येणाऱ्या रिक्षांचा अधिक समावेश आहे. यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत नाहीत.
रेल्वेस्थानक परिसरात अनधिकृतपणे बस्तान मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची वाट अडवली होती. त्यामुळे फेरीवाले आणि प्रवाशांमध्ये अनेकदा वाद झाले होते. ही बाब लक्षात घेत ठाणे पालिकेने हा परिसर फेरीवालामुक्त करून प्रवाशांची वाट मोकळी करून दिली. मागील काही दिवसांपासून काही रिक्षाचालक थांबा सोडून फेरिवालामुक्त झालेल्या परिसरात रिक्षा उभ्या करून प्रवाशांची वाट अडवीत आहेत. त्यामुळे हा परिसर फेरीवालामुक्त झाला असला तरी रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवाशांना अडथळा मुक्त मार्गक्रमण करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी चालक रिक्षा उभ्या करत आहेत तेथून वाहतूक पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर आहे.
भाजप महिला मोर्चा आक्रमक
रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखालील पोलिस चौकी ते आलोक हॉटेलपर्यंत उभ्या राहणाऱ्या बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात भाजप महिला मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या चालकांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. महिला मोर्चाच्या नौपाडा मंडळ अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वाहतूक पोलिस विभागाच्या सहायक आयुक्त के. के. गावित यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात विशाखा कणकोसे, कमल सावळे, वैशाली विधाते, राणी क्षीरसागर यांचा समावेश होता.
अतिरिक्त प्रवासी वाहतूक
रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस प्रकल्पाखालील पोलिस चौकी ते आलोक हॉटेलपर्यंत बेशिस्त पद्धतीने चालकांकडून रिक्षा उभ्या करून रस्ता अडविला जातो. त्यानंतर अतिरिक्त प्रवासी घेतले जातात. काही रिक्षाचालकांकडून दादागिरी आणि अरेरावीचे प्रकार वाढले आहेत. काही रिक्षाचालकांकडून जवळचे भाडे असल्यास त्याला सर्रासपणे नकार दिला जात आहे. अनेक वेळा जादा भाडे आकारले जाते. तसेच रिक्षा नसल्यामुळे रांगेत उभ्या प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते. तरी या बाबींची दखल घेऊन बेकायदेशीर व बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी महिला वृषाली वाघुले-भोसले यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.