लोकल गर्दीमुळे अनुयायांचे हाल

लोकल गर्दीमुळे अनुयायांचे हाल

Published on

मुंबई, ता. ६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येत दाखल झालेल्या अनुयानांना लोकलच्या गर्दीचा सामना करावा लागला. बुधवारी (ता. ६) सीएसएमटीला येणाऱ्या लोकल दिवसभर विलंबाने धावत असल्याने प्रवाशांसह त्यांचे हाल झाले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारने मुंबईत बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे सरकारी कार्यालये बंद होती; मात्र खासगी कार्यालये आणि विविध कंपन्यांचे कामकाज सुरू होते. सार्वजनिक सुट्टी असतानाही मध्य आणि पश्चिम रेल्वेने दादरला येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी रविवारचे वेळापत्रक न चालवता आज नेहमीप्रमाणे लोकल सोडल्या. परिणामी प्रवासी आणि अनुयायांना दिलासा मिळेल अशी आशा होती; परंतु महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने चालवलेल्या लांब पल्ल्याच्या १६ विशेष गाड्यांमुळे लोकलच्या वेळापत्रकाला फटका बसला. त्या गाड्या प्राधान्याने दादर आणि सीएसएमटीला येण्यासाठी रेल्वेने कल्याण, कसारा व कर्जतकडून येणाऱ्या लोकल थांबवून त्यांना मार्ग मोकळा करून दिला. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल विलंबाने धावू लागल्या.
मध्य-पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात पोलिसांद्वारे कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. दादर स्थानकातून चैत्यभूमीत कशा प्रकारे जायचे, याचे सूचना फलक स्थानकात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांद्वारे मदत कक्षही उभारण्यात आला होता. त्याचा अनुयायांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. रेल्वे स्थानकांत सतत उद्‍घोषणाही करण्यात येत होत्या.

सीएसएमटी-चर्चगेटमध्ये गर्दी
हार्बर मार्गाने आलेले अनुयायी कुर्ला स्थानकातून दादर गाठत होते. त्यामुळे कुर्ला स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांसह अनुयायांची गर्दी झाली होती. चैत्यभूमीचे दर्शन घेऊन मुंबईत फिरण्यासाठी अनुयायी सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानक गाठत होते. त्यामुळे दोन्ही स्थानकांत प्रचंड गर्दी झाली होती. लोकलसह बेस्ट बसही भरून धावत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.