इस्राईल आणि पॅलेस्टाईन प्रश्नावर भारताने ठाम भूमिका घ्यावी
इस्राईल आणि पॅलेस्टाईन प्रश्नावर भारताने ठाम भूमिका घ्यावी
प्रकाश आंबेडकर यांचे मत; शांती जनसभेला चांगला प्रतिसाद
मुंबादेवी, ता. ९ (बातमीदार)ः इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाच्या विषयावर भारताने दुतोंडी भूमिका न घेता ठाम भूमिका घ्यावी व सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात याबाबत शांततेचा ठराव पास करून जगाला एक नवी दिशा द्यावी. त्यासाठी काँग्रेस व समाजवादी पार्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आझाद मैदानातील शांती जनसभेच्या वेळी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आझाद मैदानात शुक्रवारी शांती सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईसह राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, की इस्राईलच्या मनमानीमुळे तेथील (गाझा पट्टी) रुग्णालये बॉम्बने उडवली जात आहेत. हजारो गर्भवती महिलांना रुग्णालयात जाता येत नाही. हे किती मोठे पाप आहे. येणारी भावी पिढी या मनमानीला माफ करणार नाही. याबाबत भारताने ठाम भूमिका घेतली तर जगात एक वेगळा संदेश जाईल व पॅलेस्टाईन नागरिकांना न्याय मिळेल. त्यासाठी काँग्रेस व समाजवादी पार्टीने महत्त्वाची भूमिका बजावत सर्वधर्मसमभाव दाखवत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक व्हावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
इस्राईलच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका व केंद्रीय मुख्य सचिव यांनी सरकारची मांडलेली भूमिका वेगवेगळी आहे. त्यामुळे जनता संभ्रमात आहे. सामान्य नागरिक भयभीत झाला आहे. राजकीय पुढारी व त्यांचे पक्ष दुहेरी भूमिकेत आहेत. त्यांचा खरा चेहरा बाहेर येत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात भारताने ठाम भूमिका जगासमोर आणावी. भारत नक्की कोणाच्या बाजूने आहे हे तरी कळेल असे आंबेडकर म्हणाले. आझाद मैदानातील या कार्यक्रमास पोलिसांनी अगोदर परवानगी नाकारली होती. हा फक्त मुस्लिम समाजाचा प्रश्न नाही, तर मानवजातीचा प्रश्न आहे, असे सांगितल्यावर परवानगी मिळाली. ही जनशांती सभा आहे, त्यामुळे भारत सरकारने या जनसमुदायाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असे आंबेडकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.