हुथी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम
नवी दिल्ली, ता. १८ : येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी लाल समुद्रातून आपल्या जहाजांना जाण्यास मज्जाव केला आहे. लाल समुद्र हा युरोप आणि आशिया यांच्यातील व्यापाराचा मुख्य सागरी मार्ग आहे. त्यामुळे सुएझ कालव्यातून होणाऱ्या व्यापारालाही धोका निर्माण झाला आहे. या १९३ कि.मी. लांबीच्या कालव्यातून जागतिक व्यापारापैकी १२ टक्के व्यापार होतो. जगातील ३० टक्के कंटेनरची वाहतूक याच मार्गावरून होते.
हुथी बंडखोरांनी आतापर्यंत १३ जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. बाब अल मंदेबमध्ये या जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. या ठिकाणाला लाल समुद्राचे प्रवेशद्वारही म्हटले जाते. हुथी बंडखोरांच्या या हल्ल्यामुळे जगातील चार सर्वांत मोठ्या शिपिंग कंपन्यांनी एमसीएस, सीएमएस सीजीएम, हॅपग लॉयड आणि मेर्स्क यांनी लाल समुद्रातून त्यांच्या व्यापारी जहाजांची वाहतूक थांबवली आहे. या चार कंपन्यांचा जागतिक सागरी व्यापारात ५३ टक्के वाटा आहे. मार्च २०२१ मध्ये जेव्हा एक मोठे जहाज सुएझ कालव्यात सहा दिवस अडकले होते, तेव्हा जागतिक पुरवठा साखळीत संकट आले होते. हा कालवा आशिया आणि युरोपची जीवनरेखा आहे. या मार्गाने युरोपला तेल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर पाम तेल आणि धान्याचाही पुरवठा याच मार्गाने होतो.
भारतावर परिणाम
सुएझ कालव्यामध्ये २०२१ मध्ये जहाज अडकल्याने त्याचा भारतावरही परिणाम झाला होता. त्या वेळी भारताचा सुमारे २०० अब्ज डॉलर्सचा सागरी व्यापार या मार्गाने होत असे; मात्र कोरोनानंतर त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भारत सुएझ कालव्याद्वारे युरोपमध्ये अन्न उत्पादने, पोशाख आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात करतो, परंतु या मार्गाने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात होते. हे संकट गडद झाल्यास विशेषतः रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो. ताज्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात नऊ टक्क्यांनी वाढून १७.३ लाख बॅरल प्रतिदिन झाली आहे. रशियातून येणारे तेल सुएझ कालव्यातून येत आहे. तिथे संघर्ष वाढला, तर भारताला पर्यायी मार्ग शोधावा लागेल; मात्र दोन्ही देशांनी नोव्हेंबरमध्ये ईस्टर्न मेरीटाइम कॉरिडॉरचा वापर करण्याचे संकेत दिले होते. ते चेन्नईला रशियाच्या व्लादिवोस्तोक बंदराशी जोडते; मात्र आता ते कार्यान्वित नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.