जेएनपीटी बंदरातून ५ कोटी ७७ लाख रुपये किमतीचे सिगारेट जप्त

जेएनपीटी बंदरातून ५ कोटी ७७ लाख रुपये किमतीचे सिगारेट जप्त
Published on

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) न्हावा-शेवा बंदरात आलेल्या एका कंटेनरमधून ५ कोटी ७७ लाख रुपये किमतीच्या तब्बल ३३ लाख ९२ हजार सिगारेट जप्त केल्या आहेत. चिंचेच्या पेटीमध्ये लपवून या सिगारेट्स परदेशातून तस्करी करून आणण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. डीआरआयने आता या सिगारेटच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या तस्करांचा शोध सुरू केला आहे.
जवाहरलाल नेहरू बंदरात परदेशातून आलेल्या व न्हावा शेवा येथील कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) मध्ये ठेवण्यात आलेल्या एका ४० फूट कंटेनरमध्ये सिगारेटचा साठा लपवून आणण्यात आल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने गुरुवारी न्हावा शेवा येथील कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) मध्ये ठेवण्यात आलेल्या ४० फूट रेफ्रिजरेटेड कंटेनरची तपासणी केली. या तपासणीत चिंचेच्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये सिगारेटची पाकिटे लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. चिंचेच्या पुठ्ठ्यांचे बॉक्स उघडल्यानंतरदेखील सिगारेटची पाकिटे सापडू नयेत, यासाठी चिंचेच्या पेट्याच्या आतमध्ये सिगारेटची पाकिटे लपवून ठेवण्यात आली होती. या कारवाईत डीआरआयच्या पथकाने या कंटेनरमधून ३३ लाख ९२ हजार सिगारेट्सचा साठा जप्त केला आहे. या सिगारेट्सची बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ७७ लाख इतकी आहे.

आयात शुल्क टाळण्यासाठी तस्करी
सिगारेट ओढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर भार पडत असल्याने सरकार अशा वस्तूंवर जास्त शुल्क आकारते. तंबाखूसारख्या उत्पादनांचे आयात करण्यासाठी लागणारे जास्त शुल्क टाळण्यासाठी छुप्या पद्धतीने तस्करीच्या मार्गाने सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ आणण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.