वसई- विरार पालिकेचा भोंगळ कारभार

वसई- विरार पालिकेचा भोंगळ कारभार

Published on

वसई- विरार पालिकेचा भोंगळ कारभार
एका कर्मचाऱ्यास दोन वेळा सेवानिवृत्ती; चौकशीची मागणी
विरार, ता. १ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या आय प्रभाग समिती कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुनील गणपत चौधरी यांना वसई-विरार महापलिकेच्या आस्थापना विभागाने दोन वेळा सेवानिवृत्त केल्याचे अजब प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केल्‍यानंतर पुन्‍हा या कर्मचाऱ्याला कामावर रुजू करण्यात आले. मात्र यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय ज्‍या कर्मचाऱ्यांच्‍या चुकीमुळे संपूर्ण प्रकरण घडले अद्यात त्‍यांच्‍यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याप्रकरणी शिवक्रांती कामगार जनरल संघटनेकडून आयुक्‍तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
एकाच कर्मचाऱ्याला दोन वेळा सेवानिवृत्त करण्याचे राज्याच्या इतिहासातील हे बहुधा पहिलेच प्रकरण असण्याची शक्यता असून वसई-विरार महापालिकेच्या आस्थापना विभागाचा हास्यास्पद कारभार राज्यात थट्टेचा विषय आहे. महापालिकेच्या आय प्रभाग समिती कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुनील गणपत चौधरी यांना तत्कालीन सहाय्यक आयुक्त व लिपिक यांनी १ डिसेंबर २०१७ रोजी सेवानिवृत्तीचे पत्र दिले होते. मुळात सुनील चौधरी हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे असतानाही या दोघा कर्मचाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत चौधरी यांना ५८ व्या वर्षीच सेवानिवृत्ती दिली होती. सदर प्रकार काही महिन्यांतच सुनील चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा सेवेत सामील करून घेण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार सुरू केला. यानंतर २१ डिसेंबर २०१८ रोजी सुनील चौधरी यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू करण्यात आले. त्याचबरोबर प्रदीप आवडेकर यांना अवैध सेवानिवृत्ती पत्राबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली. मात्र योग्य खुलासा करण्यास संबंधित अधिकारी असमर्थ ठरल्याने सुनील चौधरी यांचा तब्बल एक वर्षाच्या पगाराची व इतर लाभांची रक्कम त्‍यांच्‍या पगारातून वळती करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. यानंतर काही महिन्यांतच वयाच्या साठाव्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सुनील चौधरी यांना महापालिकेकडून पुन्हा सेवानिवृत्ती देण्यात आली. मात्र अद्यापही सुनील चौधरी यांना नुकसानीची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.
............................................................
या बोगस सेवानिवृत्ती प्रकरणी ६ मे २०२० रोजी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत उच्च अधिकाऱ्यांनी प्रदीप आवडेकर यांची खरडपट्टी काढत याप्रकरणी आवडेकर व सागर मेहेर यांच्या चुकीवर शिक्कामोर्तब करीत कामात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला व याची त्यांच्या सेवापुस्तकातही नोंद करण्यात आली. मात्र सेवानिवृत्त होऊन तीन वर्षे उलटून गेली तरीही सुनील चौधरी यांना बोगस पद्धतीने केलेल्या सेवानिवृत्ती कालावधीतील पगाराची व इतर लाभाच्या रकमेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. त्‍यामुळे सुनील चौधरी याची थकीत रक्कम सहा टक्के व्याजासहीत देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे शिवक्रांती कामगार जनरल संघटनेचे अध्यक्ष चरण भट यांनी सांगितले.
======================================
याबाबत योग्य ती माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
रमेश मनाले ,अतिरिक्त आयुक्त, वसई- विरार महानगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.