धार्मिक तीर्थक्षेत्राचा विकासाबाबत आपले सरकार कमी पडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : मलंगगडाच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या भावना मला माहीत आहेत. या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांनी मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू केले आणि आता आपण श्री मलंग बोलू लागलो, याचाही आनंद आपल्याला आहे. काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही. राज्यातील धार्मिक तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत कुठेही आपले सरकार कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे दिली.
श्री मलंगगडाच्या पायथ्याशी मंगळवारपासून राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक आहेत. या वेळी मलंगगडाच्या पायथ्यापासून दिंडीला सुरुवात करण्यात आली. भव्य अश्व रिंगण सोहळा हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते. पंढरपूरच्या वारीमध्ये ज्या पद्धतीने होतो अगदी त्याचप्रकारे इथेही रिंगण सोहळा पार पडला. त्यामध्ये पंढरपूर वारीतील ज्ञानेश्वर महाराजांचे अश्व आणण्यात आले होते. या वेळी रिंगण सोहळ्यादरम्यान दिंडीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे वारीत सहभागी झाले. या वेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, योगी गणेशनाथ महाराज, बाळासाहेब रणदिवे, मच्छिन्द्रनाथ महाराज, प्रल्हाद महाराज शास्त्री, महाराज विश्वनाथ वारिंगे यांच्यासह अनेक संतवृंद उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की ‘‘राज्यातील पुरातन मंदिरांचे संवर्धन केले जात आहे, तीर्थक्षेत्राचा विकास केला जात आहे. जे आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपले सरकार करत आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरासाठी १३८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. पंढरपूरचादेखील विकास झाला पाहिजे, यासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही, धार्मिक तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत कुठेही आपले सरकार कमी पडणार नाही.’’
..
आध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचे
जगण्यासाठी माणसाला श्रद्धेचा ठेवा आवश्यक असतो. राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान हे सर्वांत वरती आहे, ही भावना आमच्या मनात आहे. हरिनाम सप्ताह ही काळाची गरज आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.