वाहनांची विक्रीचा ‘टॉप गिअर’; ‘एफएडीए’च्या अहवाल, डिसेंबरमध्ये २१ टक्के वाढ
मुंबई : डिसेंबर महिन्यात सर्व प्रकारची वाहनविक्री वाढली असून या वर्षातही लग्नसराई, निवडणुका, पायाभूत सुविधांवरील सरकारचा वाढता खर्च यामुळे वाहनांची विक्री वाढतीच राहील, असा अंदाज फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (एफएडीए) अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
किरकोळ वाहन विक्रीत डिसेंबर महिन्यात २१ टक्के वाढ झाली. या महिन्यात सर्व प्रकारच्या वाहन विक्रीत वाढ झाली असून दुचाकीची विक्री २८ टक्क्यांनी वाढली, तिचाकींची विक्री ३६ टक्क्यांनी वाढली, मोटारींची विक्री तीन टक्के वाढली,
ट्रॅक्टरची विक्री ०.२ टक्के वाढली; तर व्यापारी वाहनांची विक्री १.३ टक्के वाढली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने दिली आहे. २०२३ या कॅलेंडर वर्षात वर्ष २०२२ पेक्षा एकंदर वाहन विक्रीत अकरा टक्के वाढ झाली.
या वर्षभरातही दुचाकी वाहनांची विक्री साडेनऊ टक्के वाढली. तीनचाकी वाहनांची विक्री तब्बल साडेअठ्ठावन्न टक्के वाढली. मोटारींची विक्री अकरा टक्के, ट्रॅक्टरची विक्री सात टक्के; तर व्यापारी वाहनांची विक्री आठ टक्के वाढली.
१६ डिसेंबर ते १५ जानेवारी यादरम्यान खरमास या महिन्यात नवीन व्यवहार होत नसल्यामुळे या काळात वाहन विक्री थंड राहील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही येत्या काही महिन्यांत वाहनविक्री क्षेत्राची वाढ उत्साहवर्धक राहील असा अंदाज आहे.
अनेक कंपन्या नव्या मॉडेलच्या गाड्या बाजारात आणत असून आपल्या मार्गातील अडचणी दूर करीत असल्यामुळे त्यांची विक्री वाढेल, असा अंदाज आहे. ग्राहकांच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे २०२४ या कॅलेंडर वर्षात वाहन विक्री वाढतीच राहील असा अंदाज आहे, अशी माहिती एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी दिली.
मागणी वाढण्याची अपेक्षा
एप्रिल-मे मधील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीवरील खर्च वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच या कालावधीत शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या हातातही पैसा खेळत असल्यामुळे तसेच इंधनाच्या किमती कमी होण्याचा अंदाज असल्यामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. सणासुदीचा हंगाम तसेच लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यानेही मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
इलेक्ट्रॉनिक वाहने अधिक
या वर्षात दीर्घ कालावधीचा विचार करता इलेक्ट्रॉनिक वाहने मोठ्या संख्येने बाजारात येतील अशी अपेक्षा आहे; तर निवडणुकांच्या आधी पायाभूत प्रकल्पांवर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करणार असल्यामुळे तसेच कोळसा, सिमेंट, खनिज-खाणी या क्षेत्रातील मागणीमुळे जुनी वाहने बदलून नव्या वाहनांची खरेदी होण्याचीही अपेक्षा आहे. या सर्व बाबींमुळे या वर्षातही वाहनविक्री वेग घेईल, असा एफएडीएचा अंदाज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.