Mumbai News: या तारखेला होणार पनवेल आगाराच्या कामाला सुरुवात!
मुंबई विभागातील मध्यवर्ती बस स्थानक म्हणून पनवेल आगाराची ओळख आहे. २०१८ मध्ये ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर या स्थानकात सुरतच्या धर्तीवर बस पोर्ट उभारण्याचा प्रस्ताव आहे, पण तांत्रिक त्रुटींमुळे बस आगाराच्या उभारणीचे काम रेंगाळले आहे. अशातच आगाराच्या पुनर्बांधणीचे काम घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच आगाराला भेट दिली असून १५ फेब्रुवारीपासून पनवेल आगाराच्या कामाला सुरुवात होणार आहे.
पनवेल आगाराच्या नूतनीकरणाच्या २३५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मे. इडस या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मुंबई विभागातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या स्थानकातून कोकणाकडे जाणाऱ्या बसच्या दररोज हजारो फेऱ्या होत आहेत.
त्यामुळे सुरतच्या बस डेपोच्या धर्तीवर या स्थानकाची नव्याने उभारणी केली जाणार आहे, पण यासाठीच्या काढलेल्या निविदा तसेच त्यानंतर डिझाईनमधील तांत्रिक त्रुटींमुळे पूर्तता करण्यासाठी वेळ गेला आहे. सध्या अंतिम आराखडा तयार झाला असताना पुन्हा नियमावली बदलल्याने या प्रकल्पाचे नव्याने डिझाईन करण्यात आले आहे. या आराखड्याला पनवेल महापालिकेने मंजुरी दिली आहे. याकरिता आठ विभागांचे ‘ना हरकत’ आणि परवानग्या मिळवल्या आहेत. त्या अनुषंगाने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सेवा
मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पनवेलमधील बस आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून एसटी गाड्या ये-जा करीत असतात. त्यातून दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक होते. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या बसस्थानकातून प्रवास करतात.
पनवेल आगारातून ५६ गाड्यांच्या मदतीने सेवा दिली जाते. यामध्ये सातारा, एरंडोल, धुळे, नगर व शिर्डी या सहा लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या नऊ महाड विनावाहक आणि सुमारे ७० फेऱ्या गाव पातळीवरील आहेत. त्यासाठी ५६ चालक, ५६ चालक-वाहक व ९२ वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे.
आराखड्यातील महत्त्वाच्या तरतुदी
- आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रेल्वेचे टर्मिनन्स पनवेल येथे होणार आहे. येथील नागरीकरण वाढीचा वेग पाहून एसटी आगाराच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण तेव्हा कामाला मंजुरी मिळाली नाही. आता महायुतीच्या काळात मे. इडस कंपनीच्या २३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
२०१८-१९ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शहरातील १७ हजार ५०० चौरस मीटर भूखंडावर असणाऱ्या पनवेल एसटी स्थानकाच्या जागेवर अद्ययावत बसस्थानक उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. सध्या पनवेल एसटी स्थानकाकडे ८.५० एफएसआय भूखंड उपलब्ध आहे. या भूखंडापैकी ५० टक्के एफएसआयवर बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
- स्थानकाच्या उर्वरित जागेवर एसटी कार्यालय व व्यावसायिक बांधकाम करण्यात येईल. त्याचबरोबर पार्किंग, अत्याधुनिक स्वरूपाचे फलाट, वर कार्यालय, विश्रामगृह, कॉन्फरन्स हॉल, स्वच्छतागृह याशिवाय इतर सर्व सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर येथे मॉल आणि इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात येणार आहे.
पनवेलमधील वाढते नागरीकरण पाहता एसटी आगाराच्या नूतनीकरण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून ठेकेदारही नियुक्त केला आहे. २३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून कार्यादेश काढला आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल
आगार बांधणीची बाब ही एसटी महामंडळाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १६ जानेवारीला पनवेल आगाराला भेट देऊन आगाराची पाहणी केली आहे. त्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात आगाराचे काम सुरू होणार आहे.
- सुजित डोळस, आगार प्रमुख, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.