Navi Mumbai Crime: ड्रग्ज तस्करांवर संक्रांत; एका वर्षात तब्बल इतक्या जणांवर केली कारवाई
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २०२३ या वर्षामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करून अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या ३५३ आरोपींना अटक केली आहे. २९० कारवायांमध्ये सुमारे २१ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहिमेद्वार ७ महिलांसह ३० परदेशी नागरिकांची धरपकड करून तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे.
एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावारूपाला आलेल्या नवी मुंबई शहरालादेखील अमली पदार्थाचा विळखा पडला आहे. नवी मुंबई परिसरात ड्रग्स माफियांकडून तरुणांना ड्रग्स विक्री करण्यात येत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईत सुरू असलेली अमली पदार्थांची तस्करी उद्ध्वस्त करून त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांनी २०२३ या वर्षामध्ये अमली पदार्थाशी संबंधित एकूण २९० गुन्हे दाखल करून ३५३ आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात ७ महिलांसह ३७ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या कारवाईत सुमारे २१ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
यात ९ कोटी ३३ लाख ३४ हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन), ५ कोटी ९६ लाख रुपये किमतीचे ७ किलो ४२९ ग्रॅम वजनाचे मेथ्यॅक्युलॉन, ३ कोटी ६४ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १८२ किलोच्या १०० ग्रॅम वजनाच्या थर्माडोल टॅबलेट्स जप्त करण्यात आले आहेत.
प्रकार बाजारभावानुसार किमत
कोकेन - १ कोटी २५ लाख २० हजार
एम्फेटामाईन - २३ लाख ८४ हजार
एमडीएमएच्या गोळ्या - २२ लाख १० हजार
एलएसडी पेपर - १९ लाख ८० हजार
चरस - १५ लाख ४० हजार
गांजा - ८ लाख ४७ हजार
कोडाईन सिरप - २ लाख ८ हजार ३३३
ब्राऊन शुगर - १ लाख ७८ हजार ९२०
हेरॉईन - ३३ हजार १६०
नेट्राझेपेम टॅबलेट्स - ७,६९२
एकूण २१ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये
गुटखा, हुक्का पार्लर रडारवर
नवी मुंबई पोलिस आणि अमली पदार्थविरोधी पथकाने गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या तस्करी प्रकरणात १०६ कारवाया करून १८२ आरोपींना अटक केली आहे. तसेच १ कोटी ७० लाख ४७ हजार ३३० रुपये किमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
तसेच हुक्का पार्लरच्या ४१ कारवाया करून २२६ पुरुष व ७ महिला अशा एकूण २३३ जणांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी कोफ्टा कायद्यांतर्गत ३० कारवाया करून ४३ जणांना अटक केली आहे.
शाळा-कॉलेज, झोपडपट्टीत खरेदी-विक्री
एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावारूपाला आलेल्या नवी मुंबई शहरालादेखील अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. नवी मुंबई परिसरात ड्रग्ज माफियांकडून तरुणांना ड्रग्जची विक्री करण्यात येत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. नवी मुंबईतील शाळा-कॉलेज व झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील झोपडपट्ट्यामधून गांजा, चरस, गुटखा यांसारखे अमली पदार्थ महिला व भिकाऱ्यांच्या माध्यमातून विकण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
परदेशी नागरिकांवरील मोठी कारवाई
नवी मुंबईत बेकायदा वास्तव्यास असलेले बहुतेक परदेशी नागरिक हे अमली पदार्थांच्या तस्करीत तसेच गुन्हेगारी कारवायात गुंतल्याचे आढळून आले होते. त्यामुळे परदेशी नागरिकांकडून सुरू असलेली अमली पदार्थांची तस्करी व त्यांचे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले होते.
त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने नवी मुंबईत बेकायदा वास्तव्यास राहून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांवर दोन महिन्यात सहा ठिकाणी धाड टाकून एकुण ३७ परदेशी नागरिकांना अटक केली होती.
शहरातील अमली पदार्थाचे रॅकेट उद्ध्वस्त करून त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल नवी मुंबईतील शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेत आहेत.
- नीरज चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.