पोखरण पार्किंग प्लाझामध्ये गॅरेज

पोखरण पार्किंग प्लाझामध्ये गॅरेज

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ज्युपिटर येथील पार्किंग प्लाझात रुग्णालय उभारण्याचा घाट सुरू असतानाच ठाणे पालिकेने पोखरण रोड येथील आणखी एका पार्किंग प्लाझाचे रूपांतर गॅरेजमध्ये केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. २०० वाहने सामावून घेण्याची क्षमता असलेल्या या पार्किंग प्लाझाचा वापर सध्या पालिकेच्या वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी होत आहे. एकीकडे शहरात वाहनतळाची बोंब असताना पालिका प्रशासनानेच सर्व नियम मोडीत काढल्यामुळे तक्रार करायची कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाणे शहरात वाहनांच्या संख्येने २६ लाखांचा पल्ला गाठला आहे. शहरात वर्दळीच्या ठिकाणी पार्किंगची सोय पुरेशी नसल्याने ठाणेकर रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करत आहेत. त्यात टोईंग व्हॅनची टांगती तलवार सतत डोक्यावर असल्याने रोज शेकडो वाहनचालकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. या जाचातून सुटका व्हावी, यासाठी ठिकठिकाणी बहुमजली पार्किंग प्लाझा पालिका उभारत आहे; मात्र स्वत:च बांधलेल्या पार्किंग प्लाझाचा गैरवापर प्रशासन करत असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी कोव्हिड काळात तात्पुरती सोय म्हणून ज्यूपिटर हॉस्पिटलजवळील पार्किंग प्लाझाचे रूपांतर कोव्हिड रुग्णालयात केले होते. हे रुग्णालय हजारो बाधितांना वरदान ठरल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी हॉस्पिटल चालवण्याचा घाट घातला जात आहे. त्याला विरोध वाढत असताना आता पोखरण रोड क्र. २ वरील पार्किंग प्लाझाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पोखरण रोड परिसरात नागरी वस्ती वाढत असून येथे वाहनांची वर्दळही वाढली आहे. अशावेळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गांधीनगर येथील मोक्याच्या ठिकाणी पालिकेने काही वर्षांपूर्वी येथे तळ अधिक दोन मजल्यांचे पार्किंग प्लाझा उभारले होते. एका ठेकेदारामार्फत हे पार्किंग प्लाझा चालवले जात होते; मात्र थकबाकी वाढल्याने ठेकेदाराचा ठेका रद्द करून पालिकेने पुन्हा हे पार्किंग प्लाझा ताब्यात घेतले. दरम्यान ,दादोजी कोंडदेवजवळील जवाहर बाग येथे असलेले पालिकेच्या वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेज स्मशानभूमीच्या विस्तारात गेले. त्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने पोखरण रोडवरील पार्किंग प्लाझाचा आसरा घेतला आहे. सध्या येथे पालिकेच्या नादुरुस्त वाहनांची गर्दी आहे. अनधिकृत बांधकामे किंवा बेकायदा वापर होत असलेल्या मिळकतीवर पालिका नियमाप्रमाणे कारवाई करते. मग खुद्द पालिकेनेच सर्व नियम धाब्यावर बसवत पार्किंग प्लाझाचे रूपांतरण गॅरेजमध्ये कसे केले, असा प्रश्न यानिनित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.