Thane News: तर ठाण्यावर येणार पाणीबाणीचे संकट..!
Thane News: राज्यात बहुतेक ठिकाणी उन्हाळ्याच्या आधीच पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. हे संकट उभे राहिले असतानाच आता राज्यासमोर आणखी एक संकट उभे राहू पाहत आहे.
पाणीपुरवठा करणारे जीवन प्राधिकरणचे कर्मचारी-अधिकारी २७ फेब्रुवारीपासून धरणे उपोषण सुरू करत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात सुरू होणाऱ्या या आंदोलनात पाच हजार कर्मचारी- अधिकारी सहभागी होणार आहेत.
ठाण्यासह राज्यातील नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण कार्यक्रम, जलजीवन मिशनद्वारे घर घर नल योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी अखेर बंडाचे शस्त्र उपसले आहे. शासनाच्या विरोधात या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
त्यामुळे अत्यावश्यक सुविधांचा बोजवारा उडण्याच्या भीतीने शासनाची चिंता वाढली आहे. अजूनही शासन जागे झाले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.
कोकण परिमंडळात सध्या अधिकारी आणि कर्मचारी असे मिळून तीन हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यांच्यावर लोकांना नागरी सुविधा, ग्रामीण जनतेला पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण सेवेची जबाबदारी आहे, मात्र असे असतानाही शासनाकडून नेहमीच या कर्मचारी- अधिकाऱ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे.
शासनाकडे वारंवार स्मरणपत्रे, मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप करतानाच सातव्या वेतन आयोगानुसार शहर भत्ता व वाहतूक भत्ता, घडभाडे भत्ता मिळणे अपेक्षित असताना एकही बाब अजून पूर्ण झालेली नाही. याशिवाय रिक्त पदे, पदोन्नतीचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. अशा अनेक समस्यांनी कर्मचारी हैराण झाले आहेत.
त्याविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष समितीचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.