Crime News: लग्नाच्या प्रलोभनाने तरुणीला लाखोंचा गंडा; मैट्रोमोनियल साईटवरुन कसा घडला झाला प्रकार?
Thane Crime: भरमसाट पैसे घेऊन लग्न जुळवणारी विवाह संकेतस्थळेही मुलींसाठी सुरक्षित राहिली नाहीत. कारण इथेही अनेक लखोबा लोखंडेंचा शिरकाव झालेला आहे. अशाच एका लखोबाने ठाण्यातील तरुण शिक्षिकेला फसवले.
लग्नाच्या भूलथापा मारून त्याने तिच्याकडून तब्बल ११ लाख रुपये उकळले; मात्र तरुणींना फसवणाऱ्या या आरोपीला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले. भास्कर शिर्के असे त्याचे नाव असून तो उच्चशिक्षित आहे.
पुण्यात राहणाऱ्या भास्कर शिर्केने एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. बोलण्यात तो पटाईत आहे. याच जोरावर त्याने अनेक तरुणींना गंडा घातलेला आहे. ठाण्यात राहणारी २९ वर्षीय तरुणीही अशाच प्रकारे त्याच्या जाळ्यात आली. एका विवाह संकेतस्थळावर दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मोबाईलवरून बोलणे सुरू झाले. आरोपीने या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले.
आपला ट्रेडिंग कंपनी आणि बांधकामाचा व्यवसाय असल्याचे तिला सांगितले. त्यानंतर ओळख झाल्यापासून अवघ्या तीनच दिवसांत त्याने तिच्याकडून खोटे कारण सांगून ४० हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात भेट झालेली नसतानाही तिने त्याला पैसे दिले. त्यानंतर गेल्या ९ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत खोटी कारणे सांगून आरोपीने तिच्याकडून ११ लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून उकळले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने वागळे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिस पथकाने याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त गजानन काब्दुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून बँक तपशील, मोबाईल लोकेशन तपासून आरोपीला नांदेडमधून अटक केली.
विवाह संकेतस्थळावर नाव नोंदवताना मुलगा किंवा मुलीची संपूर्ण माहिती घेऊन पुढील प्रक्रिया करावी. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता समोरच्याची कौटुंबिक माहिती, त्याच्या पार्श्वभूमीची माहिती मिळाल्यानंतर स्वतः भेट घेणे गरजेचे आहे.
- शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वागळे इस्टेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.