Anil Desai : खासदार अनिल देसाई यांची गुन्हे शाखेकडून चौकशी; ५० कोटींची रक्कम ठाकरे गटाने हस्तांतरित केल्याचा आरोप
Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनिल देसाई यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ५ मार्चला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते. त्यानुसार ते मंगळवारी सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले.
निवडणूक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी ‘शिंदे गट’ हाच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतरही ठाकरे गटाकडून आयकर विभाग व टीडीएस लॉग इन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार शिंदे गटाकडून मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती.
त्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीला सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातील ५० कोटींची रक्कम ठाकरे गटाने हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या टॅन व पॅन क्रमांकावरून लॉग इन करून ही रक्कम भरण्यात आली, याबाबत माहिती घेण्यासाठी देसाई यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. शिवसेनेच्या नावाच्या लॉग इन आयडी व पासवर्डचा गैरवापर कोणाकडून झाला की नाही, याबाबतची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिस आयुक्तांकडे तक्रार
शिंदे गटाचे किरण पावसकर, खजिनदार बालाजी किणीकर आणि सचिव संजय मोरे यांनी ३० जानेवारीला मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन ठाकरे गटाकडून आयकर विभागाचे लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी आता या प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.