Mumbai Local: एसी लोकलमध्ये ‘खाकी’ची घुसखोरी; प्रवाशांची गैरसोय
Mumbai News: एसी लोकल आणि प्रथम श्रेणीचा महिला डब्यात सर्रासपणे विनातिकीट खाकी वर्दीधारी आणि रेल्वे कर्मचारी चढत असल्याने पासधारक प्रवाशांना बसण्यासाठी जागा राहत नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
परिणामी, आता खाकी वर्दीधारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांविरोधात महिला प्रवासी आक्रमक झाल्या असून या संदर्भात रेल्वेकडे तक्रारी आल्या आहे. त्याकडे रेल्वे प्रवाशांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईकर गारेगार प्रवासासाठी एसी लोकलमधून प्रवास करतात. सध्या एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशात अपुऱ्या एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे अगोदरच प्रवासी हैराण झाले आहेत. त्यात एसी लोकलचे महागडे तिकीट आणि पास काढून घुसखोरांना दररोज तोंड द्यावे लागत असल्याचे तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक खाकी वर्दीतील जीआरपी आणि आरपीएफ कर्मचारी सर्रासपणे विनातिकीट एसी लोकलमधून प्रवास करताना दिसत आहेत.
अनेकदा एसी लोकलमधील कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासनीसांकडे तक्रारी केल्यानंतर फक्त समज देऊन कर्मचाऱ्यांना उतरविण्यात येते.
मात्र त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही. हे प्रकार सर्रासपणे गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घडतात. त्यामुळे एसी लोकल आणि प्रथम श्रेणीच्या पासधाकर आणि तिकीटधारक प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
टोळींना अडवा
ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचारी आणि खाकीवर्दीतील महिला कर्मचाऱ्यांची टोळी एसी लोकलमध्ये शिरतात आणि जागा अडवून ठेवतात. या संदर्भात जाब विचारल्यास अनेकदा महिला प्रवाशांशी टोळीतील कर्मचारी हुज्जत घालत असल्याचे प्रकार घडले आहे.
याशिवाय महिला प्रथम श्रेणीच्या डब्यात सर्रासपणे गणवेशातील कर्मचारी चढतात. त्यामुळे त्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेने विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणीही प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
एसी लोकल आणि प्रथम श्रेणीच्या महिला डब्याचा घुसखोराची तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे रेल्वे, आरपीएफ आणि जीआरपीने नोटिफिकेशन काढून आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात. तसेच टीसींसुद्धा अशा कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करावी. जेणेकरून हे प्रकार थांबतील.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
------------
रेल्वेने तत्काळ आपल्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करवीत. अनेकदा प्रवाशांनी टीसीच्या लक्षात आणून दिले. मात्र, टीसीसुद्धा कारवाई करत नाहीत. या संदर्भात एसी लोकल आणि प्रथम श्रेणीच्या पासधारक महिला प्रवाशांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने तत्काळ कारवाई अभियान सुरू करावे.
- लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय प्रवासी महासंघ
------
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरी, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी करण्यात येते. प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.
- पी. डी. पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
----------
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राखीव लोकलमध्ये एखादा सामान्य प्रवासी अनावधानाने चढल्यास त्यांना साखळी खेचून उतरविण्यात येते. सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकलमध्ये हेच कर्मचारी विनातिकीट प्रवास करतात; मग हा सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय नाही का? रेल्वेने याची योग्य दखल घ्यावी. तसेच विनातिकीट खाकी वर्दीतील कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
- ज्योती साबळे, महिला प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.