Loksabha Election 2024 : आचारसंहितेची टांगती तलवार; कामे उरकून घेण्यासाठी म्हाडा कार्यालयात वर्दळ वाढली
मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे म्हाडा कार्यालयात रखडलेली आपली कामे करून घेण्यासाठी कंत्राटदरांसह विकसकांची वर्दळ वाढली आहे. एरवी रिकामे असलेले म्हाडा कार्यालय सध्या गजबजलेले दिसते. प्रत्येकजण आपली फाईल कुठे आहे, ती कशी पूर्ण होईल, याच विचारात धावपळ करताना दिसत आहेत.
वांद्रे पूर्वेकडील म्हाडा मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, रिपेअरिंग बोर्डासह वेगवेगळी कार्यालये आहेत. म्हाडाच्या जागेवरील इमारतींचा पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी, त्याबाबतचे आराखडे मंजूर करणे, जुन्या इमारतींची दुरुस्ती अशा विविध प्रकल्पांच्या कामासाठी मंजूऱ्या या मुख्य कार्यालयातून दिल्या जातात.
मात्र कोणत्याही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर म्हाडाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली जाते. त्यामुळे तसे झाल्यास आपली फाईल निवडणूका होईपर्यंत अडकून पडले, या भीतीने अनेक विकसक, कंत्राटदार आपल्या फाईल्स मंजूर करून घेण्यासाठी कार्यालयात दररोज फेऱ्या मारत आहेत. तसेच त्यामुळे सध्या म्हाडा कार्यालयात मोठी गर्दी होत असून अनेकजण आपली वाहने घेऊन येत असल्याने ती उभा करण्यासही म्हाडा कार्यालय परिसरात आणि बाहेर जागा नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘एसआरए’, ‘एमएसआरडीसी’मध्ये सारखेच चित्र
म्हाडाप्रमाणे बाजूलाच असलेल्या एसआरए आणि वांद्रे पश्चिमेकडील एमएसआरडीसीच्या कार्यालयातही विकसक, कंत्राटदारांची मोठी गर्दी होत आहे. प्रत्येक जण आपली फाईल कशी मंजूर होईल, याच विवेंचनेत असल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर या कार्यालयातील कामे ठप्प होतील या भीतीने नागरिक आपली कामे रखडू नये म्हणू चकरा मारत असल्याचे ‘एसआरए’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.