Mumbai Local News: मुंबई लोकल स्थानकांची नावे बदला पण इतर समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या!
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे मुंबईतल्या आठ उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर रेल्वे प्रवाशांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘सकाळ’ने यापैकी एक सर्कल उपनगरीय रेल्वेस्थानकावर जाऊन प्रवाशांचे मत जाणून घेतले आहे.
सोबत रेल्वेस्थानकांवरच्या प्रवासी सुविधांचाही आढावा घेतला. अनेकांनी स्थानकाला देवाचे नाव देण्याऐवजी स्थानिक नाव देणे गरजेचे होते, या भावना व्यक्त केल्या; तर नामांतरापेक्षा प्रवासी सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज या प्रवाशांनी व्यक्त केली.
हार्बर रेल्वे मार्गावरील वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या किंग्ज सर्कल स्थानकाच्या नामांतराला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता या स्थानकाला ‘तीर्थंकर पार्श्वनाथ’ हे नाव देण्यात आले आहे. रेल्वेस्थानकाचे नामांतर केले तरी समस्या सोडवण्यावर प्रशासनाने भर द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
रेल्वेस्थानकात प्रशासनाने नुकतीच प्रवासी शेड आणि प्रवाशांना बसण्याची व्यवस्था केली आहे. असे असले तरी रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. या धुळीमुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे पूर्व दिशेला स्थानकाला लागून बेकायदेशीर झोपड्या आहेत. या झोपड्यांवर असलेल्या ताडपत्री प्लॅटफॉर्मवर येत असतात. झोपड्यांमुळे पूर्व दिशेने स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना रस्ता मिळत नाही. रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूची मुले रेल्वेच्या वाय-फायवर स्थानक परिसरात मोबाईलवर गेम खेळतात. ऑनलाईन गेम खेळणाऱ्या या तरुणांच्या आरडाओरड्यामुळे प्रवासी कंटाळले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
नामांतराचे लोकांचे मत-
नामांतराच्या निर्णयाचे समर्थन - २९ टक्के
प्रवासी सुविधेची गरज- ६२ टक्के
नामांतर आणि प्रवासी सुविधेवर समाधानी- ९ टक्के
या आहेत समस्या
स्थानकातील निम्म्याहून अधिक एटीव्हीएम मशीन बंद आहेत.
प्रसाधनगृह अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त आहेत.
स्थानकात सरकते जीने नाहीत.
अग्निरोधक रोधक यंत्रणा उपलब्ध नाही.
रेल्वेस्थानकांचे नामांतर करून प्रवाशांच्या रोजच्या समस्या सुटणार नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून किंग्ज सर्कल स्थानकातून प्रवास करत आहे. अजूनही येथील अतिक्रमणांचा प्रश्न सुटला नाही.
- प्रमोद शांताराम जाधव, प्रवासी
आमचा नामांतराला विरोध नाही. नामांतराबरोबर प्रवासी सुरक्षा आणि सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- भीकाजी लोखंडे, प्रवासी
किंग्ज सर्कल रेल्वेस्थानकाला ‘तीर्थंकर पार्श्वनाथ’ नाव दिले. ही आनंदाची गोष्ट आहे, मात्र या नावाचे पावित्र्य जपणे रेल्वेला शक्य होणार आहे का? तसेच गर्दुल्ले हद्दपार करावेत, स्वच्छता ठेवावी, जेणेकरून प्रवाशांना स्थानकात मोकळा श्वास घेता येईल.
- आनंद देवरे, प्रवासी
नामांतराला विरोध नाही. मात्र, मुंबईकरांचा सुखद आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.