Thane News: सुभाष मैदानात वाहनांच्या रांगा; खेळाडूंना अडथळा
Thane News: शहरात मोजकीच मैदाने शिल्लक आहेत; मात्र त्यातही मैदानातील बहुतांश जागा ही वाहन पार्किंगसाठी वापरली जात आहे. कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या सुभाष मैदानातदेखील दररोज रांगेत वाहने उभी केली जात आहेत.
या वाहनांचा खेळाडूंना अडथळा निर्माण होत आहे. डोंबिवलीतील नेहरू मैदानातदेखील वाहन पार्किंग केल्याचे याआधी आढळून आले आहे. रस्त्यांवर वाहनांनी अतिक्रमण केलेले असताना आता मैदानातदेखील वाहने पार्क केली जात असल्याने खेळाडू, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या बाजूलाच असलेले सुभाष मैदान शहराचे वैभव म्हणून ओळखले जाते. या मैदानाची दुरवस्था असल्याने खेळाडू, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. परीक्षांचा हंगाम सुरू असून लवकरच शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या लागतील. शहरात काही मोजकीच मैदाने खेळण्याजोगी असल्याने त्या ठिकाणी खेळाडू मुलांची गर्दी होते. कल्याणमधील सुभाष मैदान त्यातीलच एक आहे. या मैदानावर एरवी खेळाडू, मुलांची तसेच फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची रीघ दिसून येते.
कल्याणमधील सर्वांत जुने मैदान म्हणून सभाष मैदानाची ओळख आहे. हे मैदान मोठे असून पालिका मुख्यालय, अत्रे रंगमंदिराच्या जवळ आहे. अत्रे रंगमंदिर तसेच पालिकेत कामानिमित्त येणारे काही नागरिक, ठेकेदार, व्यावसायिक या मैदानात आपली वाहने पार्क करतात. या वाहनांमुळे खेळाडूंना अनेकदा अडचण निर्माण होते. चेंडू लागून वाहनांचे नुकसान झाले, तर अशी भीतीदेखील त्यांना असते.
डोंबिवलीतदेखील एका कार्यक्रमासाठी नेहरू मैदानात पार्किंगची सोय आयोजकांनी केली होती. यानंतर सुभाष मैदानाच्या बाहेर तर वाहने पार्क असतात, परंतु आत मैदानात वाहने उभी करण्यास परवानगी कशी दिली जाते, असा सवाल नागरिक, खेळाडू करत आहेत. जवळच पालिकेचे मुख्यालय आहे अधिकाऱ्यांना ही बाब दिसत नाही का, अशीही विचारणा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.