ST News: अवैध प्रवासी वाहतुकीची एसटीला झळ; प्रवासी संख्या होतेय कमी
मुंबई, ता. २२ : एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महामंडळाला शासनाची मदत घ्यावी लागत आहे; तर दुसरीकडे काही अनधिकृत प्रवासी वाहतूक वाढली असून त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी होत आहे. अनधिकृत वाहनांवरील कारवाई केल्यास एसटीच्या उत्पन्नात भर पडते; पण सध्या ही कारवाई थंडावल्याने एसटीला फटका बसत आहे, असे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये टप्पे प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आहेत. काही प्रवासी वाहनांना टप्पा वाहतुकीची परवानगी नसताना ते वाहतूक करत आहेत. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करीत आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध प्रवासी वाहतुकीवर बंदी घातली असताना लाखो वाहने अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. शासन व संबंधित विभाग अवैध वाहतूक रोखण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत, असे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
---
एसटी महामंडळाचे उत्पन्न कमी होण्याला निव्वळ खासगी अवैध वाहतूक व शासनाच्या परवानगीने सुरू असलेली खासगी वाहतूक जबाबदार आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनधिकृत वाहनांना पोलिस व आरटीओ या दोघांचे अभय आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस
---
भारक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्यास चालकाचे वाहनावरील नियंत्रण कमी होते. अवैध प्रवासी वाहतुकीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. अपघाती मृत्यू झालेल्या घटनांमध्ये अनेकदा अवैध प्रवासी वाहतूक असते. कित्येकदा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांतूनही प्रवासी वाहतूक होते. यावर आरटीओ आणि पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- संदीप गायकवाड, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था
------
एसटी स्थानक परिसरात होत असलेल्या अवैधपणे प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल.
- एम. रामकुमार, अपर पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.