Mumbai News: नाल्यातील गाळ काढण्यासाठी मनपा करणार तब्बल १८० कोटींचा खर्च!
Mumbai News: पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्व नाल्यांतील गाळ काढण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. एप्रिल अखेरपर्यंत ३५ टक्के; तर मेअखेरपर्यंत ४० टक्के असा एकूण ७५ टक्के गाळउपसा करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.
आतापर्यंत लहान-मोठ्या नाल्यातील पाच टक्के गाळउपसा करण्यात आला आहे. नाल्यातील गाळ काढण्यासाठी १८० कोटींचा पालिका खर्च करणार आहे.
पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होते; मात्र यंदा मार्चअखेर नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून विविध कंत्राटदाराच्या माध्यमातून नाल्यातील गाळउपसा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याची ठिकाणांत येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक वेळा पाणी भरल्याचे प्रकार घडतात.
छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यातून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो.
मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्यांतील पाणी शहरात जमा होते. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम हाती घेण्यात येते.
दर वर्षी मार्चच्या सुरुवातीला नालेसफाई सुरू केली जाते; मात्र यंदा नालेसफाईच्या कामाची वर्क ऑर्डर दिल्यानंतर आता कामाला सुरुवात न झाल्याने ३१ मे अखेरपर्यंत ७५ नालेसफाई होणार, का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कंत्राटदाराला गाळाच्या वजनानुसार पैसे
पालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. कंत्राटदाराने काढलेल्या गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत. शिवाय कंत्राटदाराच्या कामावर नजर ठेवण्यात येणार आहे.
तक्रारीसाठी १ एप्रिलपासून डॅशबोर्ड
आपल्या विभागातील नाल्यांच्या सफाईची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी १ एप्रिलपासून डॅशबोर्ड सुरू करणार आहे. या डॅशबोर्डवर नागरिकांना नालेसफाईबाबतच्या तक्रारीही करता येणार आहेत. डॅशबोर्डवर नाल्याचा फोटो टाकल्यास पालिका तातडीने कार्यवाही करणार आहे.
निवडणूक कामामुळे अडचण
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचा सुमारे ५० हजारांहून जास्त कर्मचारी जाणार आहे. त्यामुळे नालेसफाईसह सर्वच कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. देखरेखीसाठी मनुष्यबळाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबईतील नाले
छोटे नाले - १५०८ (लांबी ६०५ किमी)
मोठे नाले - ३०९ (लांबी २९० किमी)
आढावा बैठक
गाळउपसा करण्यासाठी ३० एप्रिलअखेरपर्यंत ३५ टक्के लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार हे लक्ष्य किती पूर्ण झाले याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ३० एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.