Paduka Darshan sohala 2024
Paduka Darshan sohala 2024sakal

Paduka Darshan sohala 2024 : भक्तिमय सुरांमुळे समाधीची अनुभूती ; शंकर महादेवन यांच्या गायनाने उत्सवाची सुरेल सांगता

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवानिमित्त दोन दिवस भक्तिभावाने भारावून गेलेल्या वातावरणाची आज सांगीतिक सांगता झाली. सोहळ्याचे साक्षीदार झालेल्या हजारो गुरुसेवकांना प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर सुरांनी मंत्रमुग्ध केले.
Published on

नवी मुंबई : श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवानिमित्त दोन दिवस भक्तिभावाने भारावून गेलेल्या वातावरणाची आज सांगीतिक सांगता झाली. सोहळ्याचे साक्षीदार झालेल्या हजारो गुरुसेवकांना प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर सुरांनी मंत्रमुग्ध केले. गुरू पादुकांच्या दर्शनाचा सुवर्णयोग जुळून आलाच, शिवाय महादेवन यांच्या भक्तिमय सुरांमुळे समाधीचीही अनुभूती त्यांना घेता आली.

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव सोहळ्यात मंगळवारी (ता. २६) ज्येष्ठ गायक हरिहरन यांचा सांगीतिक कार्यक्रम झाला. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी शंकर महादेवन यांच्या भक्तिगीतांचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. महादेवन यांना पाहण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष ऐकण्यासाठी सकाळपासूनच भाविकांमध्ये उत्सुकता दिसून आली. कार्यक्रम स्थळी मुंबई-नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या गुरुसेवकांनी त्यांची भक्तिगीते ऐकण्यासाठी विशेष उपस्थिती लावली होती. महादेवन यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छासह पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. संगीत सोहळ्याची सुरुवात विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करणाऱ्या ‘एकदंताय वक्रतुण्डाय...’ गीताने झाली. भाविकांनी महादेवन यांच्या सुरात सूर मिसळत केलेल्या ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने सारा परिसर भक्तिरसात दंग झाला.

सूर, तालाचा अप्रतिम आविष्कार

बासरी, वीणा, तबला आणि शंकर महादेवन यांचे सूर यांचा अप्रतिम आविष्कार उपस्थितांना अनुभवायला मिळाला. अमित पाध्ये (हार्मोनियम), प्रसाद पाध्ये (तबला) आणि प्रीतमदा (गिटार) आणि प्रभाकर (पकवाज) यांची प्रत्येक गाण्यात लाभलेली उत्तम साथ कार्यक्रमाचे वैशिष्ट ठरले.

शिवम महादेवनची सुरेल साथ

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील ‘सूर निरागस हो..’ गाण्यातून शिवम महादेवन याने वडील शंकर महादेवन यांना सुरेल साथ दिली. त्यानंतर ‘मोरया मोरया...’च्या गजरात भाविक हरखून गेले. ‘हर हर हर, शिव भोला भंडारी... हर हर महादेव’ भक्तिगीताच्या तालात भाविक तल्लीन झाले. हात उंचावत भाविकांनी धरलेला ताल आणि वाद्यांचा सुंदर मिलाफ डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

भक्तिरसाची भाविकांना अनुभूती

‘कौन कहते है भगवान आते नही...’, ‘माझे माहेर पंढरी...’ इत्यादी भाविकांसाठी समर्पित केलेल्या भक्तिगीतांबरोबर ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माऊली तुकाराम...’, ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’ नामाचा गजर शंकर महादेवन यांनी केला. ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी भक्तिरसाची अनुभूती घेतली.

सरस रचनांचे सादरीकरण

पंडित भीमसेन जोशी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘बाजे मुरलिया बाजे रे बाजे रे’ या गीताची शंकर महादेवन यांनी आठवण सांगितली. आवाज खराब झाला आहे. मात्र, मी तुम्हाला नाराज करणार नाही, असे सांगत महादेवन यांनी एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्या.

नवी मुंबईत श्री गुरूंच्या पादुकांचे दर्शन झाले, हे आपले भाग्य आहे. एवढा मोठा श्री गुरूंच्या पादुकांचा दर्शन सोहळा आणि एवढा मोठा आशीर्वाद आपणास मिळत आहे. ते भाग्य या भूमीतून आपल्याला मिळाले आहे.

- शंकर महादेवन, संगीतकार-गायक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.