Thane News: ठाणे लोकसभेचा तिढा सुटेना; उत्तर मिळत नसल्याने पदाधिकारी संभ्रमात
Navi Mumbai news: ठाणे लोकसभा मतदारसंघाकरिता शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अटीतटीच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघावर भाजपने दावा केल्यामुळे नवा संघर्ष निर्माण झाला आहे.
शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक, उपनेते विजय नाहटा यांची नावे चर्चेत आहेत; तर भाजपकडून माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आदींची नावे समोर येत आहेत.
परंतु नेमकी ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार आहे, यापासून ते उमेदवार कोण, इथपर्यंतच्या चर्चांना उत्तर मिळत नसल्याने पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत.
शिवसेना व भाजप महायुतीचा राज्यातील लोकसभेच्या जागावाटपांचा तिढा ठाण्याच्या जागेमुळे अडकून पडला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असणारा ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला न देण्यास शिवसेना अडून बसली आहे. दुसरीकडे ठाणे शिवसेनेकडून मिळवण्यास भाजपनेही तेवढाच जोर लावला आहे.
दोन्ही पक्षांकडून ठाण्यावर दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात उमेदवारांबाबतही दोन्ही पक्षांमध्ये गोंधळ वाढत चालला आहे. दररोज नवनवीन इच्छुकांची भाऊगर्दी वाढत चालली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा होती. आता नवी मुंबईतून माजी खासदार संजीव नाईक यांचे नाव पुढे येत आहे.
या दोघांच्या नावाची स्पर्धा असताना माजी आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनाही ठाण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी माथाडी कामगारांनी लावून धरली आहे.
नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर येथे वास्तव्याला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील माथाडी कामगारांची ताकद पाटील यांच्या मागे असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेमध्येही नवी मुंबईतून उपनेते विजय नाहटा यांचे नाव समोर येत आहे. नाहटा यांनी २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप उमदेवारांना काटे की टक्कर दिली होती.
त्यानंतर नाहटा यांचे नाव नवी मुंबई आणि ठाणे परिसरात प्रसिद्ध झाले; परंतु उमेदवारांची नावे वाढत असली, तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा नक्की कोणत्या पक्षाला मिळणार, हे निश्चित होत नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस संभ्रम वाढत आहे.
नक्की कोणता उमेदवार आणि चिन्ह?
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या अनेक वेळा बैठका आणि मेळावे झाले आहेत; परंतु कोणत्याच बैठकीत काही निष्पन्न झालेले नाही. ठाणे शहरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन वेळा बैठका झाल्या.
ऐरोलीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत ठाणे आणि नवी मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.
ऐरोली येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत थेट धनुष्यबाणावर लढणारा उमेदवार हवा, अशी घोषणा करून अप्रत्यक्षरीत्या भाजपच्या उमेदवाराला विरोधही केला.
नंतर ठाण्यात झालेल्या बैठकीत उमेदवार कोणत्याही मित्रपक्षाचा असो. प्रचार सर्वांनाच करावा लागेल, अशी री ओढली. वेळोवेळी बदलणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या चमत्कारीक शब्दांमुळे कार्यकर्ते हैराण झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.