Mumbai News: मुंबई - नाशिक महामार्गावरील पादचारी पुलाच्या कामाला गती

Mumbai News: मुंबई - नाशिक महामार्गावरील पादचारी पुलाच्या कामाला गती

Published on

ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : मुंबई- नाशिक महामार्गाच्या एका लेनवर पादचारी पुलाचे स्टील गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. क्रेनच्या साहाय्याने हा गर्डर बसवला आहे. आता उर्वरित नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील अर्ध्या लेनवरही लवकरच गर्डर टाकले जाणार आहेत. या पादचारी पुलामुळे लोढा आणि परिसरातील रहिवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवाय या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबई- नाशिक महामार्गावर लोढा आणि परिसरातील इतर संकुलातील रहिवाशांसाठी पादचारी पूल बांधला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या पुलाच्या उभारणीचे काम सुरू होते. पुलाचे काम दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाले. या ठिकाणी समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा मार्ग आहे. त्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर मोठी वाहतूककोंडी होत आहे; मात्र आता पादचारी पुलाच्या गर्डर टाकण्याचे काम झाल्याने या मार्गावरील अडथळा दूर झाला आहे. तसेच त्याखालील मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणदेखील पूर्ण झाले आहे. लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. गर्डरच्या कामासाठी वाहतूक विभाग पोलिसांकडून ७ एप्रिलला रात्री एक ते पहाटे चार वाजेपर्यंत घोडबंदरहून नाशिककडे तसेच मुंबईहून नाशिककडे जाणारी अवजड व हलकी वाहने पर्यायी मार्गाने वळवली होती. आता ती पूर्ववत सुरू केल्याने वाहतूककोंडी कमी झाली आहे.

पादचारी पुलामुळे लोढा आणि परिसरातील रहिवाशांना नाशिक- मुंबई महामार्ग ओलांडणे सोपे होणार आहे. त्यांना थेट राबोडी, साकेतच्या रस्त्यावर आणि तेथून ठाणे स्टेशन, ठाणे बाजारपेठेत जाणे सोईचे होणार आहे. माजिवडा येथील नाशिकच्या दिशेला उतरत असलेल्या पुलाजवळ अनेक ठिकाणचे मार्ग एकत्र येतात. घोडबंदर, मुंबई, ठाणे, अहमदाबाद महामार्ग पुलावरून येणाऱ्या गाड्या नाशिकच्या दिशेने जातात, तीन मार्ग एका मार्गावर उतरतात, तसेच नाशिककडून येणाऱ्या मार्गाला मुंबई, ठाणे, घोडबंदरकडे जाणारे तीन मार्ग मिळतात. त्यामुळे माजिवडा उतरणीच्या पुलाजवळील जागा जास्त कोंडी करणारी ठरते. अशावेळी हा महामार्ग ओलांडणे जास्त धोक्याचे होते. तो धोका या पादचारी पुलामुळे नाहीसा झाला आहे.

माजिवडा पुलाच्या उतरणीचा भाग पुढे दोन मार्गांचा होत असल्याने येथे बरेचदा वाहनांची कोंडी होते; मात्र आता या ठिकाणचे रस्ते विस्तीर्ण केले असून त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावर एका बाजूच्या पादचारी पुलाचा गर्डर बसवण्यात आला आहे, तर दुसरा गर्डर तयार असून तोही लवकरच बसवला जाईल. सध्या तो वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, अशा ठिकाणी रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा अडथळा दूर झाला असून कोंडीही कमी झाली आहे.
- डॉ. विनयकुमार राठोड, उपआयुक्त वाहतूक विभाग, ठाणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.