पर्यावरण संरक्षणासाठी कृतिशीलतेची गरज

पर्यावरण संरक्षणासाठी कृतिशीलतेची गरज

वाणगाव, ता. २९ (बातमीदार) : यंदा जिल्ह्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. एकीकडे एप्रिल-मे महिन्यात तापमानात झालेली वाढ, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतीचे झालेले नुकसान अशी हवामान बदलाची गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे एकूणच वातावरणात अनपेक्षित बदल दिसत आहेत. पर्यावरणावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येकाने स्वतःहून कृतिशीलतेने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डहाणू कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले.
मानवी जीवन आणि पर्यावरण याचा अनादी काळापासूनचा संबंध आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अमर्याद गरजांची पूर्तता करण्यासाठी; तसेच प्रगतीच्या नावाखाली आपल्या स्वार्थासाठी मानवाने आपल्या सर्व नैसर्गिक घटकांचा वारेमाप वापर केला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली आहे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली वाहनांची संख्या वाढली. कारखाने भरमसाठ वाढले. परिणामी, वायुप्रदूषण वाढले. कारखान्यांचे दूषित पाणी, नद्या-नाले; तसेच समुद्रात सोडल्याने जलप्रदूषण वाढले. अधिक शेती उत्पादनाच्या लोभापायी भरमसाठ रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनी दूषित झाल्या. पाण्याचा अतिवापराने जमिनीत क्षारपड, नापीक झाल्या. रस्ते, घरे, उद्योग यासाठी बेसुमार जंगलतोड झाली. परिणामी, जलचक्र बिघडले, तापमान वाढले. प्लास्टिकचा वापर वाढल्याने नैसर्गिक विघटन क्रियेत बाधा निर्माण झाली. आनंदोत्सवाच्या नादात मोठमोठ्याने डीजे, फटाके यामुळे ध्वनिप्रदूषण होते, तर वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न यात भर घालतात. या सर्व नैसर्गिक घटकांच्या प्रदूषणामुळे मानवी स्वास्थ्य तर बिघडले; पण अवकाळी पाऊस, गारपीट, तापमानात वाढ, महापूर यांसारख्या समस्या वाढल्या, असेही जाधव यांनी सांगितले.
संकट गळ्यापर्यंत आल्यानंतर आपल्याला जाग येते, असा अनुभव आहे; पण अजूनही वेळ गेली नाही. आपण सर्वांनी मिळून ठरवले, तर नक्कीच पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो. मात्र, त्यासाठी प्रत्येकाचा कृतिशील सहभाग आवश्यक आहे, असे मत डॉ. विलास जाधव यांनी व्यक्त केले.

काय करायले हवे?
१) पर्यावरण रक्षणासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू केला पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्षलागवड मोहीम हाती घेतली पाहिजे.
२) थोड्या अंतरावर जायचे असेल, तर वाहनांचा वापर न करता पायी चालत जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्य असेल तेथे सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे.
३) औद्योगिक महामंडळांनी कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रणाची सक्ती करावी. प्रदूषण नियंत्रणाच्या कायद्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
४) सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. नद्या, नाले स्वच्छ करावेत, त्यासाठी मोहीम घेऊन स्वच्छतेचे कार्यक्रम आयोजित करावे.
५) पर्यावरण विषयास प्राधान्य देऊन व्यापक जनजागृती करावी. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचे अवलंबन केला पाहिजे.
६) गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत यावर भर द्यावा. जैवविविधता संरक्षण उपक्रम हाती घेतले पाहिजेत.
७) कमी पाण्यावर होणारी पिकाची लागवड करावी. जमिनीचे संवर्धन, संरक्षण होण्यासाठी पाणलोट विकासाचे उपक्रम राबविले पाहिजेत.
८) ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ यांसारखे जलसंधारण कार्यक्रम घ्यावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com