मिलिंद नार्वेकर यांचा निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश!
मिलिंद नार्वेकर यांचा निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश!
मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २ : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमवेत गेली तीस वर्षे सावलीसारख्या वावरणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांचा निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश झाला आहे. नार्वेकर यांचे नाव वेगवेगळ्या पदांसाठी चर्चेत येत होते. ते क्रिकेट असोसिएशन आणि तिरुपती देवस्थानात सक्रिय आहेत.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईची जागा ते शिंदे गटाकडून लढतील, अशीही चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ऑफर त्यांनी स्वतःच उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली होती. नार्वेकर मालाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते; पण उद्धव ठाकरे यांच्यासमवेत ते असायला हवेत, असे सांगत त्यांना उमेदवारी देण्यापासून काही जणांनी रोखल्याचे समजते. एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेल्या नार्वेकर यांची आता सेनेच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बंड करत गुजरातमध्ये निघून गेले, तेव्हाही उद्धव यांच्यातर्फे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी नार्वेकरच सुरतला गेले होते. गेल्या काही वर्षांपासून नार्वेकर यांचे प्रस्थ शिवसेनेत कसे वाढले, याची चर्चा सातत्याने रंगत आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे हे ‘मातोश्री’पासून दूर होण्यामागे मिलिंद नार्वेकर हेही एक कारण असल्याची चर्चा रंगत आहे. ‘चहापेक्षा किटली गरम’ या आशयाचे स्वीय सचिवांबाबत वापरले जाणारे विधान त्यांच्याबाबत नेहमीच केले जाते. मात्र महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात काहीसे अंतर निर्माण झाल्याची ही जोरदार चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्याशी नार्वेकर यांचे संबंध तसेच आहेत; मात्र त्यांच्या कुटुंबाला नार्वेकर यांच्याबद्दल काही आक्षेप असल्याचेही सांगितले जायचे. आज ते प्रवाद मिटले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही निवडणुका जिंकत विधान परिषदेतील संख्याबळ वाढवले. या विजयानंतर आत्मविश्वासाने बाराव्या उमेदवाराची घोषणा करत उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केले. त्यातच नार्वेकर उमेदवार असल्याने ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे शिवसेना (ठाकरे गट) लढणार असल्याचीही चर्चा आहे. गेली काही दशके उद्धवजींचे निरोप अन्य पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोचवत अनेक महत्त्वाची ऑपरेशन्स लीलया पार पाडणारे नार्वेकर यांची उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणुकीच्या राजकारणात खऱ्या अर्थाने प्रवेश करतील.
..
सर्वपक्षीय संबंधाचा फायदा
मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध लक्षात घेता ते जिंकतीलच, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. ठाकरेंचे विरोधक असलेल्या भाजप नेते आशीष शेलार यांनी त्यांना दिलेल्या अलिंगनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शिवसेनेबरोबरच काँग्रेसची अतिरिक्त मते मिळाल्यानंतर बाकी पक्षांमधील त्यांचे मित्रही त्यांना दुसऱ्या क्रमांकाच्या प्राधान्यक्रमातील मते देऊ शकतात. निवडणूक झाली तर या प्राधान्यक्रमाच्या जोरावर मिलिंद नार्वेकर यांचा विजय निश्चित मानला जातो. मंगळवारी (ता. २) त्यांच्या संपत्तीचे विवरणही त्यांनी अर्जाबरोबर सादर केल्याने आता ही माहितीही सार्वजनिक झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.