Cyber Crime Complaint
Cyber Crime Complaintesakal

Mumbai Cyber Crime: सायबर पोलिस आहे म्हणून फोन आला अन्.. जागरूक नागरिकाने असा उधळला लूटमारीचा प्रयत्न उधळला

तळेगावकर यांचा विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी पाठवलेल्या ओळखपत्रावर निवृत्त पोलिस उपायुक्त प्रदीप सावंत यांचे छायाचित्र होते.
Published on

मुंबई, ता. १६ ः एरव्ही अनेकांना विविध प्रलोभन दाखवत, भीती घालत सहज लुटणाऱ्या सायबर भामट्यांना चक्क एका सतर्क नागरिकाने चकवले. इतके की, भीतीपोटी त्यांना आपले फोन बंद करावे लागले. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हाच चकवा अपेक्षित असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. वीरेंद्र तळेगावकर आझाद मैदान परिसरात काही कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने उच्च न्यायालयातील कारकून अशी ओळख सांगत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.

आयसीआयसीआय बँकेत उघडलेल्या खात्यातून मोठ्या रकमांचे संशयास्पद व्यवहार केल्याचा आरोप तुमच्यावर असून नोटीस जारी झाल्याचे त्याने सांगितले. हे व्यवहार तुम्ही केले नसतील तर सायबर पोलिसांकडे तक्रार द्या, असे सांगत या व्यक्तीने फोन ट्रान्सफर केला. समोरून अन्य व्यक्तीने आपली ओळख सायबर पोलिस अशी दाखवत तळेगावकर यांच्याशी संवाद साधला.

तळेगावकर यांनी वरील दोन्ही अनोळखी व्यक्तींचे संवाद शांतपणे ऐकून घेतले आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी नोटीस पाठवा, अशी मागणी केली. त्यानंतर संबंधित बँकेच्या खात्यातून जे संशयास्पद व्यवहार झाले त्याचे तपशील मागितले. तेव्हा भामट्यांची त्रेधा उडाली.

अवघ्या अर्ध्या-एका तासात तळेगावकरांना चार वेगवेगळ्या क्रमांकावरून सायबर पोलिसांकडे तक्रार करा, अशी विनवणी करणारे दूरध्वनी आले. त्यापैकी एकाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (प्रोफाईलवर) मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह होते. एकाने तर आपले ओळखपत्रही पाठवले. मात्र, हे कोर्ट कर्मचारी, पोलिस नसून भामटे आहेत, हे तळेगावकर यांनी आधीच ओळखले होते. तळेगावकर भीक घालत नाहीत हे लक्षात येताच भामट्यांनी स्वतःच त्यांना ब्लॉक केले, स्वतःचे सर्व मोबाईल क्रमांक बंद केले.

त्याआधीच त्यांचे मोबाईल झाले बंद

भामट्यांसोबत बोलता बोलता मी आझाद मैदान पोलिस ठाण्यात आलो. तेथील सायबर अधिकाऱ्यांचे आणि या भामट्यांचे बोलणे करून देण्याचा माझा हेतू होता. मात्र, त्याआधीच त्यांचे मोबाईल बंद झाले. व्हॉट्सॲपच्या प्रोफाईलवरील मुंबई पोलिसांचे बोधचिन्हही गायब झाले होते, अशी प्रतिक्रिया तळेगावकर यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

निवृत्त उपायुक्तांच्या छायाचित्राचा वापर

तळेगावकर यांचा विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी पाठवलेल्या ओळखपत्रावर निवृत्त पोलिस उपायुक्त प्रदीप सावंत यांचे छायाचित्र होते. याआधीही आजी, माजी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचा, छायाचित्रांचा वापर भामट्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.