मुरबाड-कल्याण प्रवासात दमछाक

मुरबाड-कल्याण प्रवासात दमछाक

Published on

कल्याण/मुरबाड ता.२६ ः कल्याण-नगर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग ६६ ला जोडणारा रायते पूल उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे दिवसभर पाण्याखाली होता. शुक्रवारी पूर ओसरल्यानंतर पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पुलावरून होणारी वाहतूक बंद ठेवली असल्याने मुंबई, तसेच उपनगरांत प्रवास करणाऱ्या मुरबाड परिसरातील चाकरमान्यांची दमछाक होत आहे.
मुसळधार पावसामुळे कल्याण परिसरातील नद्यांना पूर आला होता. मुरबाड कल्याण रस्त्यावरील रायते गावाजवळ पुलाचेही या पुरामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून कल्याण ते मुरबाड माळशेज घाट मार्गे नगर परिसरात होणाऱ्या वाहतुकीला फटका बसला आहे. या पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर तडे गेले आहेत, तसेच रस्त्याचा काही भाग खचल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मुरबाड ते कल्याण जाण्यासाठी बारवी धरण बदलापूर, अंबरनाथ, कल्याण असा वळसा घालावा लागत आहे, तर काही वाहने मुरबाड गोवेली, टिटवाळा मार्गे कल्याणला जात आहेत.
--------------------------------
नाहक आर्थिक भुर्दंड
या मार्गावरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे विस्कळित झाल्याने अनेक चाकरमान्यांना गुरुवारी घरीच थांबावे लागले होते, तर शुक्रवारी सकाळीही या मार्गावर वाहतूक बंद असल्याने अनेकांना वळसा घालत कल्याण गाठावे लागत आहे. या दोन्ही मार्गाने प्रवास करताना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुलावरील वाहतूक सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
----------------------------
ब्रिटिशकालीन आर्च पद्धतीने उभारलेल्या रायते पुलाची उंची कमी आहे. प्राथमिक पाहणीत हा पूल सुरक्षित असल्याचे दिसत आहे, मात्र ड्रोनद्वारे सर्व बाजूने तपासणी करून खात्री केल्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे.
-सचिन शेजाळ, तहसीलदार, कल्याण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.